Viral News: चंद्रपूरमधील लोहारा गावातील एका हॉटेलमध्ये भलामोठा अजगर आढळल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. हॉटेलमालकाला याबाबत माहिती दिल्यानंतर सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. या अजगराची सुटका करून काही तासांतच लोहारा जंगलात सोडण्यात आल्याची माहिती आहे. या अजगरचा लांबी ८ फूट असल्याचे सांगितले जात आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, बटाट्याने भरलेल्या बॉक्समध्ये एक मोठा अजगर आढळून येतो. त्यानंतर एक व्यक्ती या अजगराला जंगलात सोडताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ चंद्रपुरातील लोहारा गावातील आहे. या गावातील एका हॉटेलमध्ये हा अजगर आढळून आला, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील चंदर विहार परिसरातील एसडीएम मॉडेल स्कूलजवळ एक अजगर दिसला होता. या अजगराला पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
अजगर हा जगात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. भारतात पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर आढळतात, ज्याला रॉक पायथॉन असेही म्हणतात. हे अजगर घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवर देखील वावरतात.
भारतात अजगर पाळणे, मारणे अथवा त्याचे कातडे जवळ बाळगणे यावर कायद्याने बंदी आहे. काही आदिवासी खाण्यासाठी अजगराची शिकार करतात. काही वेळा भीतीपोटीही ते अजगर मारले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात अजगराच्या कातड्याला मोठी मागणी असते. अजगराच्या कातड्यापासून पर्स, पट्टे वगैरे तयार केले जातात. यासाठी काही लोक अजगराची शिकार करतात. अजगरांची शिकार वाढल्यामुळे अनेक भागांतील अजगर कमी झाले आहेत.