Snake Viral News: उत्तर प्रदेशातील महोबा परिसरात एका १९ वर्षीय तरुणीला सर्पदंश झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तरुणीच्या कुटुंबाने असा दावा केला आहे की, गेल्या पाच वर्षांपासून एक काळ्या रंगाचा साप तिचा पाठलाग करत आहे. या कालावधीत सापाने तब्बल ११ वेळा तिला दंश केला आहे. संबंधित तरुणी घरात स्वयंपाक करत असताना सापाने तिला शेवटचा दंश केला. या घटनेने संपूर्ण गावासह तिच्यावर उपचार करणारे डॉक्टरही हैराण झाले आहेत.
हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्ह्यातील चरखारी तालुक्यातील पंचमपुरा गावातील आहे. या गावात राहणारी दलपत अहिरवार यांची १९ वर्षांची मुलगी रोशनी हिला २०१९ मध्ये पहिल्यांदा सापाने दंश केला. हा प्रकार पहिल्यांदा घडला, जेव्हा रोशनी शेतात हरभरा तोडत होती. तेव्हापासून हा साप रोशनीचा पाठलाग करत असून आतापर्यंत ११ वेळा तिला दंश केला आहे, असा दावा रोशनीच्या कुटुंबाने केला आहे. सुदैवाने, प्रत्येक वेळी उपचार घेतल्यानंतर रोशनीचा जीव वाचला आहे.
दलपत अहिरवार यांनी सांगितले की, रोशनीला गेल्या पाच वर्षात ११ वेळा सर्पदंश झाला आहे. घर असो, शेत असो किंवा दवाखाना असो, साप तिचा पाठलाग करतो आणि तिला दंश करतो. एकदा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान रोशनीला बेडवरच सापाने दंश केला, असाही दावा दलपत यांनी केला.
कितीही प्रयत्न केले तरी साप तिला दंश केल्याशिवाय राहत नाही. यासाठी त्यांनी तांत्रिकांकडे जाऊन देवाची पूजा व अभिषेकही करून घेतला. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन माफी मागितली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. काही दिवसांतच सापाने पुन्हा तिला दंश केला. या तरुणीवर उपचार करणारे डॉक्टर राजेश भट्ट देखील हैराण झाले आहेत. 'या तरुणीला सर्पदंश झाल्यामुळे अनेकदा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळीही सर्पदंश झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, असे भट्ट म्हणाले.
काही दिवसांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्याला सापाने दंश केला होता. त्यानंतर त्यानेही सापाला पकडून त्याचा दोनदा चावा घेतला. सापाचा चावा घेतल्यानंतर सापाचा तिथेच मृत्यू झाला. संतोष लोहार (वय, ३५) असे या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. सापाचा चावा घेतल्याने आपल्या शरीरातील विष पुन्हा सापाच्या शरीरात जाऊ शकते, अशी त्याची धारणा होती. पण त्याने लगेच जवळचे रुग्णालय गाठून उपचार घेतले. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले.
संबंधित बातम्या