Mumbai Shocking News: पत्नीला रेड लाईट एरियात नेऊन तिला 'बारबाला' म्हणत तिला अपमानित केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी आरोपी पक्षाला नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्यास सांगितले. तक्रारदार महिला दहिसरच्या कंदेरपाडा येथे राहते. वर्षभरापूर्वी तिचा आरोपीशी विवाह झाला होता. आरोपीने कार घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावला. तसेच तो तिला वारंवार 'बारबाला' म्हणत असे, असेही फिर्यादी महिलेने तक्रारीत नमूद केले.
फिर्यादी महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या लग्नात सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे दागिने आणि काही महागड्या घरगुती वस्तू भेट म्हणून दिल्या. पण, लग्नानंतर काही महिन्यांनी तिच्या सासरच्यांचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. पीडिताची सासू सातत्याने तिला शिवीगाळ करायची आणि सासराही तिचा तिरस्कार करायचा.
महिलेने आरोप केला आहे की, तिच्या सासूने आपल्या मुलासाठी कार घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्यास सांगितले. नकार देताच त्यांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी पीडितेच्या पालकांनी आपल्या मुलीच्या सासरच्या मंडळींना समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच पीडिताशी गैरवर्तन आणि मारहाण न करण्याची विनंती केली. मात्र, तरीही सासरच्या मंडळीकडून तिचा छळ सुरूच ठेवला. त्यानंतर पीडिताच्या पतीने चक्क तिला रेड लाईट एरियात नेले आणि बार गर्ल तुझ्यापेक्षा जास्त समजदार असल्याचे म्हटले. यानंतर पीडित महिलेने पतीविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून तिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. दिल्पिस सिंग उर्फ विकी कुलंदर सिंह विक्र असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, मन्नत कौर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.