Rahul Gandhi on cash for votes : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे विरारमधील हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप झाल्यानंतर व तिथं नोटाही मिळाल्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला आहे. या प्रकाराचे पडसाद राष्ट्रीय पातळीवरही उमटले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विरारच्या विवांत हॉटेलमधील व्हिडिओ शेअर केला असून पंतप्रधान मोदी यांना प्रश्न केला आहे. ‘मोदीजी, हे ५ कोटी कोणाच्या तिजोरीतून आले आहेत. जनतेचा पैसा लुटून तो टेम्पोतून तुम्हाला कोणी पाठवला?,’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘नरेंद्र मोदी हे 'मनी पॉवर' आणि ‘मस्सल पॉवर’ वापरून महाराष्ट्राला 'सेफ’ करत आहेत. एकीकडं राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर जीवघेणा हल्ला होतो, दुसरीकडं भाजपचा ज्येष्ठ नेते ५ कोटींच्या कॅशसह पकडला जातो. ही महाराष्ट्राची विचारधारा नाही. जनता उद्या मतदानातून यास उत्तर देईल, असं खर्गे यांनी म्हटलं आहे.
विरारमधील प्रकरणावर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आचारसंहिता काळात कार्यकर्त्यांना ईव्हीएम मशिन व अन्य बाबींची माहिती देण्यासाठी आम्ही विवांत हॉटेलात बैठक घेतली होती. मात्र आम्ही पैसे वाटत आहोत, असं तिथल्या आमच्या मित्रपक्षाच्या उमेदवाराला वाटलं. मात्र तसं काहीही नव्हतं. जे सत्य आहे ते समोर आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, असं तावडे यांनी म्हटलं आहे.
भाजप आणि महायुती पराभवाच्या भीतीनं मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर करत आहे. विनोद तावडे यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडलं आहे. त्यामुळं तावडे यांना तात्काळ अटक केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.