मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Abhishek Ghosalkar: आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा, अभिषेक घोसाळकर यांच्या वडिलांची विनंती

Abhishek Ghosalkar: आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा, अभिषेक घोसाळकर यांच्या वडिलांची विनंती

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 11, 2024 06:10 PM IST

Vinod Ghosalkar: अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर त्यांचे वडिल आणि शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी आमच्या कुटुंबाची बदनामी थाबवण्याचे आवाहन केले आहे.

Vinod Ghosalkar And  Abhishek Ghosalkar
Vinod Ghosalkar And Abhishek Ghosalkar

Vinod Ghosalkar On Abhishek Ghosalkar Murder Case: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची दहिसरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर घोसाळकर यांच्याबाबत आक्षेपार्ह बाबी पसरवल्या जात असून एका निवेदनाद्वारे अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी हा किळसवाणा प्रकार थांबवण्याचे आवाहन केले आहे.

"माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तत्काळ थांबवा", असे निवेदन शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी जारी केले आहे.

विनोद घोसाळकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, " मी १९८२ पासून राजकारणात सक्रिय आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के राजकारण आणि २० टक्के समाजकारण या सूत्राचे तंतोतंत पालन करीत आहे. मी आणि माझा मुलगा अभिषेक आम्ही निरपेक्षपणे आणि निष्ठेने राजकारण आणि समाजकारण केले. शिवरायांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. निष्कलंकपणे आम्ही सामाजिक जीवनात वावरत आहोत, कोणताही डाग आमच्यावर नाही. मी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. नंतर विधानसभेवर निवडून गेलो. मुलगा अभिषेक आणि सून तेजस्वी हे सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले. जनतेचे प्रेम आणि विश्वास आम्हाला मिळाला. त्याला आम्ही कधीही तडा जाऊ दिला नाही. जनतेची आम्ही नि:स्वार्थपणे सेवा केली.

पुढे विनोद घोसाळकर म्हणाले की, "माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने झालेली हत्या हा आमच्यावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य असे बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू आहे. ही बदनामी कृपा करून तत्काळ थांबवा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर आमची तक्रार नोंदवा, पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे."

WhatsApp channel