मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vinda karandikar Award : डॉ.रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Vinda karandikar Award : डॉ.रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 10, 2024 12:05 AM IST

Vinda Karandikar Life time Achievement : २०२३या वर्षासाठी डॉ.रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तर पुण्याच्या मनोविकास प्रकाशन या संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे.

dr Ravindra shobhane
dr Ravindra shobhane

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने दरवर्षी नामवंत साहित्यिकास विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व प्रकाशन संस्थेस श्री. पु. भागवत पुरस्कार प्रदान केला जातो. सन २०२३ या वर्षासाठी डॉ.रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तर पुण्याच्या मनोविकास प्रकाशन या संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली. 

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे स्वरुप पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे असून श्री.पु.भागवत पुरस्काराचे स्वरुप तीन लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

केसरकर म्हणाले, साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकाची विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराकरिता निवड करण्यासाठी तसेच साहित्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या एका प्रकाशन संस्थेची श्री. पु. भागवत पुरस्कारासाठी निवड करण्याकरिता या पुरस्काराच्या निवड समितीची बैठक ७ फेब्रुवारी रोजी झाली. या बैठकीत सर्व निकषांचा समग्र विचार करुन साहित्यिकाचे साहित्य क्षेत्रातील भरीव व गुणात्मक योगदान, त्यांनी केलेले सृजनात्मक स्वरूपाचे वैविध्यपूर्ण लेखन व महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रासाठी त्यांचे संस्थात्मक योगदान या मुख्य बाबी विचारात घेऊन डॉ.रवींद्र शोभणे यांची विंदा करंदीकर पुरस्कारासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

  याबरोबरच श्री.पु.भागवत पुरस्कारासाठी सर्व निकषांचा समग्र विचार करुन पुस्तक प्रकाशन विषयातील विविधता, संस्थेने आजपर्यंत प्रकाशित केलेली ग्रंथांची संख्या व ग्रंथनिर्मिती क्षेत्रातील त्या संस्थेचे भरीव योगदान या मुख्य बाबी विचारात घेऊन मनोविकास प्रकाशन, पुणे या प्रकाशन संस्थेची सर्वानुमते निवड करण्यात आली.

अमळनेर येथे झालेल्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे होते. त्यांचे अनेक कथासंग्रह प्रकाशित आहेत.

WhatsApp channel