मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विनायक मेटेंच्या गाडीला धडक देणारा ट्रक सापडला, ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात

विनायक मेटेंच्या गाडीला धडक देणारा ट्रक सापडला, ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 15, 2022 08:17 AM IST

Vinayak Mete Accident: विनायक मेटे यांच्या कारला धडक दिल्यानतंर ट्रक पालघरच्या दिशेने गेल्याचं समजलं होतं. ट्रक पालघरमधील कासा इथला आहे.

विनायक मेटे यांच्या कारला धडक देणारा ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात
विनायक मेटे यांच्या कारला धडक देणारा ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Vinayak Mete Accident: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर काल अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणी आता आयशर ट्रक गुजरातमधून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पालघर पोलिसांनी ही कारवाई केली असून ट्रक कासा इथं आणून रायगडकडे अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अपघातानंतर पालघर, ठाणे, नवी मुंबईसह सहा पथके ट्रकचा शोध घेत होते. मेटे यांच्या गाडीला धडक दिल्यानंतर ट्रक पालघरच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने ट्रकचा नंबर शोधला आणि चालकाला ताब्यात घेतलं. ट्रकचा नंबर डीएन ०९ पी ९४०४ असा आहे. ट्रकचालकाचे नाव उमेश यादव असल्याचे समजते. आता ट्रकची ओळख पटवण्यासाठी ट्रकचालकालासुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे.

विनायक मेटे यांच्या कारला धडक दिल्यानतंर ट्रक पालघरच्या दिशेने गेल्याचं समजलं होतं. ट्रक पालघरमधील कासा इथला आहे. अपघातानंतर १० वाजून ५२ मिनिटांनी आयशर ट्रक चारोटी टोलनाक्यावरून गेला होता. ट्रकचालक गुजरातमधील वापी इथं पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी गेलेल्या पोलिसांनी वापी इथून त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर ट्रक ताब्यात घेऊन पोलिस रायगडकडे रवाना झाले.

विनायक मेटे यांच्या निधनाने शिवंसग्रामच्या कार्यकर्त्यांसह बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीडमध्ये आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.दुपारी बारा वाजल्यापासून शिवसंग्राम भवन इथे विनायक मेटे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असल्याचंही शिवसंग्राम कार्यालयाने सांगितलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग