मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  JSW Project : कोकणात जेएसडब्ल्यूच्या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध; गावकरी आंदोलनाच्या तयारीत

JSW Project : कोकणात जेएसडब्ल्यूच्या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध; गावकरी आंदोलनाच्या तयारीत

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 29, 2022 02:35 PM IST

JSW Project In Sawantwadi : कंपनीनं सावंतवाडीतील नऊ ग्रामपंचायतींना पत्र लिहून खनिज उत्खननासाठी परवानगी मागितली होती. त्याला ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

JSW Project In Sawantwadi
JSW Project In Sawantwadi (HT)

JSW Project In Sawantwadi : कोकणातील सावंतवाडीत प्रस्तावित असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या स्टील प्रोजेक्टला ग्रामस्थांनी मोठा विरोध केला आहे. कंपनीनं या प्रकल्पासाठी प्रस्तावित जागेसाठी सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, मळेवाड, धाकोरा, आरवली, आसोली, सोंसुरे, आरवली बांध आणि साखेलखोल ग्रामपंचायतींना परवानगी मागितली होती. याला ग्रामस्थांनी विरोध करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं आता कोकणात नाणारनंतर आणखी एका प्रकल्पावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

सावंतवाडीत तालुक्यातील नऊ गावांच्या जमिनीवर प्रस्तावित असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या एका प्रकल्पाच्या कामासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. परंतु या प्रकल्पामुळं भातशेती, काजूच्या बागा आणि कोकणाच्या पर्यावरणाला हानी पोहचणार असल्याचं सांगत सर्व गावांतील गावकऱ्यांनी विरोध केला आहे.

काय आहे प्रकल्प?

सावंतवाडीतील नऊ गावांच्या जमिनीवर जेएसडब्ल्यू कंपनीकडून स्टील प्रोजेक्ट उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जाणार आहे. त्यासाठी कंपनीनं सर्व ग्रामपंचायतींना एनओसी पाठवली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.

ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा...

सावंतवाडीतील नऊ ग्रामपंचायतीच्या हद्दीत हा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रकल्पासाठी आम्हाला विश्वासात न घेता काम सुरू केलं तर आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. कंपनीच्या या प्रकल्पामुळं परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जाणार असून त्यामुळं कोकणातील हिरवेगार डोंगर आणि नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट करण्यात येणार असल्याची भीती गावकऱ्यांना आहे. त्यामुळं जर प्रशासनानं या प्रकल्पासाठी गावकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन करूच पण वेळप्रसंगी कोर्टातही जाऊ असा इशारा गावातील गावकऱ्यांनी दिला आहे.

IPL_Entry_Point

विभाग