Sujay Vikhe vs Balasaheb Thorat : अहमदनगरमधला थोरात आणि विखे यांच्यातला वाद पेटला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात आघाडी उघडत विरोधी प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, संगमनेर येथील सभेत वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल वादग्रस्त विधान केल्यावर थोरात यांचे कार्यकर्ते भडकले. त्यांनी सुजय विखे पाटलांच्या भाषणानंतर सभास्थळी ठिय्या आंदोलन करत गाड्यांची तोडफोड केली. यात सुजय विखे पाटलांची गाडी देखील पेटवण्यात आली आहे. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वसंतराव देशमुखांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावातही या घटनेचे पडसाद उमटले असून अकोलेनाका परिसरात गाडी पेटवण्यात आली.
सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सुजय विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात मैदानात उतरले आहे. सध्या विखे आणि थोरात एकमेकांवर शाब्दिक वार करत आहेत. सुजय विखे पाटील यांनी थोरात यांच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे. एका प्रचारसभेत सुजय विखें यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. त्यांनी त्यांचा राजकन्या असा केला होता. याला उत्तर देत जयश्री थोरात यांनी विखे यांना उत्तर दिले होते. थोरात म्हणाल्या की, तुम्ही कोणाची टिंगल करत आहात. मी थोरात साहेबांची मुलगी असून संयम राखू शकते. मात्र, त्या सोबत मी मी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांची सुद्धा नात आहे तुम्हाला चांगली खनकावू देखील शकते असे प्रत्युत्तर जयश्री थोरात यांनी दिले होते.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात शुक्रवारी (दि. २५) सुजय विखे यांनी सभा घेतली होती. या सभेत वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. यावेळी स्टेजवर सुजय विखे देखील उपस्थित होते. दरम्यान, वसंतराव देशमुख यांनी वादग्रस्त टीका केल्याने धांदरफळ गावात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी सभास्थळी ठिय्या आंदोलन सुरू करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला, तर काही ठिकाणी गाड्या फोडून जाळपोळ देखील करण्यात आली. दरम्यान, गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला आहे.