बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरच्या माध्यमातून खात्मा करण्यात आला होता. तळोजा कारागृहातून ठाण्याला नेत असताना मुंब्रा बायपास परिसरात २३ सप्टेंबर रोजी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला होता. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे मारला गेल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं, मात्र याप्रकरणात नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाने हा संपूर्ण एन्काऊंटर बनावट असल्याचा अहवाल दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी हा अहवाल सादर करण्यात आला.
न्यायालयाने म्हटले की, अक्षय शिंदे याच्यासोबत गाडीत असलेल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर अयोग्यपद्धतीने व अनुचित बळाचा वापर केला. त्यामुळे अक्षयच्या मृत्यूसाठी हे पाच पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत.यावरुन विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
न्यायालयाने निरीक्षण नोंदवल्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत समोर आला आहे. त्याचप्रमाणे बंदुकीवर अक्षय शिंदेचे बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजप संस्थाचालकांवर कारवाई झालीच नाही तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काऊंटर करून भाजपशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केली आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या एन्काऊंटरची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे तितकी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. कारण ‘एकनाथचा एक न्याय‘ आणि ‘देवाभाऊचा न्याय‘ म्हणून स्वतःला हिरो बनवून घेण्यासाठी या एन्काऊंटरचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येत आहे.
अक्षय शिंदे हा बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी होता. य़ा प्रकरणात बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन झाल्यामुळे हे प्रकरण देशभरात गाजले होते. याप्रकरणात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. दुसऱ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ठाण्यात आणले जात असताना मुंब्रा बायपासजवळ त्याचा एन्काऊंटर केला होता. आता या प्रकरणात पाच पोलीस जबाबदार असल्याचे न्यायालयाने म्हटल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाईची टांगती तलवार आहे.
संबंधित बातम्या