Vijay Wadettiwar on MLC Election : महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत सात काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले आहे. काँग्रेसच्या सात आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मत दिल्यामुळे राष्ट्रीवाद काँग्रेस शरद पवार गट पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. दुसरीकडे महायुतीचे नऊही उमेदवार निवडून आले. काँग्रेसच्या ज्या आमदारांनी विरोधात मतदान केले आहे त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी केली.
वडेट्टीवार म्हणाले की, विधानपरिषद निवडणुकीत विरोधात मतदान करणाऱ्या आमदारांना आम्ही शोधून काढलं आहे. यासंदर्भातील अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवला असून लवकरच गद्दारांवर कारवाई केली जाईल.
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ७ आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार काँग्रेसचे नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात,सतेज पाटील आणि इतर नेत्यांनी बैठक घेऊन दिल्लीला अहवाल पाठवला आहे. त्यांच्यावर आता कारवाई केली नसल्यास पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
वडेट्टीवार म्हणाले,भाजपने आणि खोकेबाज सत्ताधाऱ्यांनी पैशाच्या बळावर काही मतं फोडली. काही मतं राजकीय दबाव टाकून फोडली. आमच्या काही आमदारांनी पक्षाचा आदेश न जुमानता सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मतदान केलं आणि ही गद्दारी आहे. या गद्दारांवर लवकरच कारवाई होईल. सत्ताधाऱ्यांनी एका मतासाठी चार-चार कोटी रुपये खर्च केले आहेत. राज्याची तिजोरी लुटून हे पैसे निवडणुकीत वापरलेवमतांची खरेदी केली.
विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्या काळी आमदारांनी दगाबाजी केली आहे, राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही काही आमदार आमच्या विरोधात गेले होते. मात्र यावेळी कोणालाही सोडले जाणार नाही. गद्दारांना आम्ही शोधून काढलं आहे. कोणी आम्हाला मतं दिली, कोणी दिली नाहीत, कोणी पक्षाशी गद्दारी केली, या लोकांची आमच्याकडे यादी आहे. या लोकांवर कारवाई व्हावी यासाठी आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिल्लीला अहवाल पाठवला आहे.
काँग्रेसच्या विरोधात जाऊन सत्ताधाऱ्यांना मदत करणाऱ्या आमदारांमध्ये नांदेडमधील काहीजण आहेत,मुंबईतील काहीजण आहेत. आम्ही त्यांची नावं शोधून काढली आहेत. त्यांची नावं आत्ता उघड करता येणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सर्वांना समजेल.
विजय वडेट्टीवार म्हणाले,विधान परिषदे निवडणुकीसाठी आम्ही सर्व आमदारांची कार्यशाळा घेतली होती. मतदानाचा फॉर्म्युला सांगितला होता. त्यानुसार मतदान करायचं होतं. मात्र काहींनी पक्षाचा आदेश मानला नाही. या गद्दारांना नक्कीच शिक्षा होईल.