Vijay Wadettiwar on Ladaki Bahin Yojana : राज्य सरकारच्या महत्त्वाकांशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या चार दिवस आधीच लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत दोन महिन्यांचे ३ हजार रुपये देऊन सरकारने रक्षाबंधनाची ओवाळणी दिली आहे. दरम्यान या योजनेच्या प्रसिद्धीसाठी सरकारकडून केलेल्या खर्चावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. वडेट्टीवार यांनी सरकारचा जीआर ट्विट केला आहे.
जेमतेम मोजक्या बहिणींना योजनेचा पहिला हफ्ता मिळाला,परंतु ढोल पिटण्यासाठी मात्र १९९ कोटी ८१ लाख रुपयांचे बिल राज्याच्या तिजोरीवर लावण्यात आले. महायुती सरकारच्या घोषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधीच २७० कोटींचा जीआर काढला असताना आता फक्त लाडकी बहीण योजनेच्या प्रचारसाठी तब्बल १९९ कोटी ८१ लाख खर्च केला जाणार आहे, असे ट्वीट करत वडेट्टीवारांनी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
वडेट्टीवारांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जेमतेम मोजक्या बहिणींना योजनेचा पहिला हफ्ता मिळाला, परंतु ढोल पिटण्यासाठी मात्र १९९ कोटी ८१ लाख रुपयांचे बिल राज्याच्या तिजोरीवर लावण्यात आले. महायुती सरकारच्या घोषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधीच २७० कोटींचा जीआर काढला असताना आता फक्त लाडकी बहीण (mukhyamantri mazi ladaki bahin yojana) योजनेच्या प्रचारसाठी तब्बल १९९ कोटी ८१ लाख खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे १५ ऑगस्ट सुट्टीचा दिवस असताना हा जीआर काढण्यात आला आहे. सुट्टीच्या दिवशी तर सोडा, कामकाजाच्या दिवशी सुद्धा मंत्रालयात जनतेची कामे होत नाही. दुसरीकडे मात्र महायुतीत सामिल पक्षांच्या हिताचे सरकारी निर्णय घेण्यासाठी १५ ऑगस्टचा दिवस सुद्धा सत्ताधारी आणि शासकीय यंत्रणा सोडत नाही. स्वतःच्या हितासाठी राबणारे किती हे तत्पर सरकार असेच म्हणावे लागेल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
या सरकारला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, युवकांना नोकऱ्या द्यायला पैसे नाही, पण स्वतःची बढाई करण्यासाठी जाहिरातीसाठी मात्र भरमसाठ खर्च सुरू आहे. दिल्लीत बसलेल्या सरदारांना खुश ठेवण्यासाठी आधीच महाराष्ट्र गहाण ठेवला आहे. येणाऱ्या विधानसभेत मतांसाठी महायुतीतील तीनही पक्ष मिळून महाराष्ट्र विकायलाही कमी करणार नाहीत, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.