मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे सरकारमध्ये ॲम्बुलन्स घोटाळा..! ८०० कोटींच्या रुग्णवाहिकांसाठी ८ हजार कोटी?

शिंदे सरकारमध्ये ॲम्बुलन्स घोटाळा..! ८०० कोटींच्या रुग्णवाहिकांसाठी ८ हजार कोटी?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 17, 2024 06:32 PM IST

Ambulance Scam : ॲम्बुलन्समधून पैसे खाण्याचा प्रकार महायुतीत सुरु झालाय. सनदी अधिकाऱ्यांना बदलीची भीती दाखवून कोट्यवधींचे टेंडर काढल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

ambulance scam
ambulance scam

आदित्य ठाकरेंनी मुंबईतील रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर तब्बल ८ हजार कोटींचा ॲम्बुलन्स घोटाळ्याचा आरोप केला आहे. आरोग्य सुविधांच्या निविदांमध्ये हा घोटाळा होत असून ८०० कोटी रुपयांच्या खरेदीसाठी ८००० कोटींची निविदा काढली जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 

विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, आता ॲम्बुलन्समधून पैसे खाण्याचा प्रकार महायुतीत सुरु झालाय. सनदी अधिकाऱ्यांना बदलीची भीती दाखवून कोट्यवधींचे टेंडर काढल्याचं समोर आलं आहे. टेंडरची मुदत १० दिवस होती त्यात कामकाजाचे दिवस केवळ ६ होते मात्र  टेंडरची रक्कम फुगवण्यात आली होती. आरोग्य विभाग १५२९ रुग्णवाहिका खरेदी करणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. यामध्ये घोटाळा झाल्याचे उघड झाले असून हे टेंडर रद्द करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे तसेच या प्रकरणाची उच्च स्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. 

वडेट्टीवार म्हणाले की, साधारणपणे कार्डिएक सुविधा असलेल्या एका ॲम्बुलन्सची किंमत ५० लाखाच्या आसपास असते. १,५२९ ॲम्बुलन्सचे  प्रति अँम्ब्युलन्स ५० लाख या प्रमाणे एकूण ७६४ कोटी ५० लाख रूपये होतात. जवळपास ८०० कोटी रूपयात होणाऱ्या या कामावर हे सरकार ८ हजार कोटी खर्च करणार आहे. या टेंडरप्रमाणे ठेकेदाराला दर महिन्याला ७४ कोटी रूपये देण्याची सरकारची तयारी आहे. अशी रक्कम ठेकेदाराला दर महिन्याला १० वर्षापर्यंत देण्यात येणार आहे. या  प्रकाराचा ठेका राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच देण्यात आला आहे. 

राज्यात समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे यावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या अपघातातील लोकांचा जीव वाचविण्यासाठी एअर ॲम्बुलन्सची गरज असताना या टेंडरमध्ये मात्र एअर ॲम्बुलन्सची कोणतीही तरतूद केली नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

WhatsApp channel