शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचे पत्ते खोलले! म्हणाले, 'ज्यांचे आमदार जास्त, त्यांचा मुख्यमंत्री ही आमची भूमिका'
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचे पत्ते खोलले! म्हणाले, 'ज्यांचे आमदार जास्त, त्यांचा मुख्यमंत्री ही आमची भूमिका'

शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचे पत्ते खोलले! म्हणाले, 'ज्यांचे आमदार जास्त, त्यांचा मुख्यमंत्री ही आमची भूमिका'

Nov 09, 2024 05:35 PM IST

Sharad Pawar On CM Post : शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही सर्व घटक पङ एकत्र बसू,ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ.

शरद पवार
शरद पवार

Maharashtra vidhan sabha election 2024 : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? ही चर्चा सुरू झाली होती. उद्धव ठाकरेंनी निवडणुकीला सामोरं जाण्याआधी मुख्यमंत्रीपदाची चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली होती. मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी व काँग्रेसने ठाकरेंनी भूमिका मान्य न करता निकालानंतर यावर निर्णय घेण्याचे जाहीर केले. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात असताना शरद पवार (sharad pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही सर्व घटक पङ एकत्र बसू, ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ. अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. एका प्रसारमाध्यमाला मुलाखत देताना शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंनी यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न शरद पवार यांना विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले की, निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्रित बसू. ज्यांच्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्यांना त्यांचा प्रतिनिधी निवडायला सांगू आणि त्याला आम्ही पाठिंबा देऊ. ही माझ्या पक्षाची भूमिका आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबरोबरच मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेसाठीही महाविकास आघाडीत संघर्ष झाला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यात नंबर वन पक्ष ठरल्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका घेतल्याची चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरेंना हे सूत्र मान्य नव्हते. त्यांचे म्हणणे होते, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधीच जाहीर करावा व मग निवडणुकीचा सामना करावा. भाजपसोबतच्या युतीचा अनुभव सांगत त्यांनी म्हटले होते की, असं केल्यास मित्रपक्षांमध्ये आपले आमदार जास्त निवडून आणण्यासाठी सहकारी पक्षाचे आमदार पाडण्याची स्पर्धा लागू शकते. यामुळे महाआघाडीला फटका बसू शकतो.

काँग्रेस-ठाकरेंच्या वादात शरद पवारांनी आपले पत्ते खोलले नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदासाठी कोणतीच चर्चा झाली नाही तसेच मुख्यमंत्रिपदाचा चेहराही समोर केला नाही. मात्र आता शरद पवारांनी स्पष्ट संकेत देत काँग्रेसच्या धोरणाशी सुसंगत भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

Whats_app_banner