काँग्रेसचा मोठा गेम; विधान परिषदेला क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांचा विधानसभेसाठी पत्ता कट!-vidhan sabha election 2024 five mla ticket cut who cross vote for vidhan parishad election ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  काँग्रेसचा मोठा गेम; विधान परिषदेला क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांचा विधानसभेसाठी पत्ता कट!

काँग्रेसचा मोठा गेम; विधान परिषदेला क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांचा विधानसभेसाठी पत्ता कट!

Aug 06, 2024 05:45 PM IST

Vidhansabhaelection2024 : काँग्रेस पक्षाकडून ५आमदारांना विधानसभा निवडणुकीत पक्षाचे तिकीट देऊ नका,असे काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांना आदेश दिले आहेत.

क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांचा विधानसभेसाठी पत्ता कट!
क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांचा विधानसभेसाठी पत्ता कट!

गेल्या महिन्यात पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parisad Election) महाविकास आघाडीला फटका बसला. काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग (Cross Voting) करत महायुतीच्या उमेदवारांना मतदान केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आमदाराचा अहवाल प्रदेश काँग्रेसने हायकमांडला पाठवला होता. आता अशा आमदारांचा विधानसभेसाठी अखेर पत्ता कट करण्यात आला आहे. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना विधानसभेला तिकीट देऊ नका,असे आदेश काँग्रेस हायकमांडने दिले आहेत.

विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. अखेर त्या आमदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ज्या आमदारांनी विधानपरिषदेत निवडणुकीत पक्षाचा व्हीप न जुमानता विरोधात जाऊन मतदान केलं, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात होती. निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक देखील पार पडली. त्यांनी पक्षांच्या आमदारांचा अहवाल वरिष्ठांना पाठवला. त्यानंतर आता फुटीर आमदारांचा विधानसभेसाठी थेट पत्ताच कट करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून ५ आमदारांना विधानसभा निवडणुकीत पक्षाचे तिकीट देऊ नका,असे काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांना आदेश दिले आहेत. ज्या आमदारांचा पत्ता कट केला जाणार आहे त्या आमदारांच्या पाच मतदार संघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी,असे देखील आदेश दिले आहेत.

पक्षाने दिलेल्या आदेशानुसार सुलभा खोडके, झिशान सिद्दीकी, हिरामन खोसकर, जितेश अंतापूरकर आणि मोहन हंबर्डे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामुळे अमरावती, इगतपुरी, वांद्रे पूर्व, नांदेड दक्षिण आणि देगलूर मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ६ ते ७ आमदारांनी अजित पवार गटाच्या उमेदवाराला मतं दिल्याचं बोललं जात होतं. काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची २८ मते मिळाली होती. ३ आमदारांनी सातव यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना सहा मते दिली होती. यातील एक मत फुटल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. भाजपसोबत गेलेले अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले काही आमदार तसेच अन्य काही आमदारांची मतं फुटल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी फुटीर आमदारांवर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील नेत्यांच्या अहवालानंतर हायकमांडने मोठा निर्णय घेतला आहे.