‘काय झाडी, काय डोंगार…’ फेम शहाजीबापू पाटील यांचं काय झालं? वाचा सांगोल्याचा निकाल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘काय झाडी, काय डोंगार…’ फेम शहाजीबापू पाटील यांचं काय झालं? वाचा सांगोल्याचा निकाल

‘काय झाडी, काय डोंगार…’ फेम शहाजीबापू पाटील यांचं काय झालं? वाचा सांगोल्याचा निकाल

Nov 23, 2024 05:15 PM IST

Sangola Constituency : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले व काय झाडी, काय डोंगार या वक्तव्याने प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

शहाजीबापू पाटील
शहाजीबापू पाटील

Maharashtra Election Results : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यावेळी प्रथमच महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होती. दोन्ही बाजुंनी जोरदार प्रचार करण्यात आला होता. शरद पवार व उद्धव ठाकरेंनी राज्य पिंजून काढून निवडणुकीचा प्रचार केला होता. मात्र मतदारांनी या निवडणुकीत मतांचं दान महायुतीच्या पारड्यात भरभरून टाकल्याचं दिसून येत आहे. शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला राज्यातील जनतेनं दोनशे पार जागा दिल्या आहेत.महायुतीला स्पष्टबहुमत मिळालं असून एकट्या शिंदे सेनेच्या महाविकास आघाडाहून अधिक जागा आल्या आहेत. मात्र शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले व काय झाडी, काय डोंगार या वक्तव्याने प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेत बंड करून ५० आमदारांसह सूरतमार्गे गुवाहाटी गाठली होती. माझ्यासोबत आलेल्या ५० आमदारांपैकी एक जरी निवडून आला नाही, तर राजकारण सोडून निघून जाईन, असे एकनाथ शिंदे अनेकदा म्हणाले आहेत. मात्र महायुतीचा राज्यभर झंझावात असला तरी सांगोल्यात वेगळा निकाल लागला आहे. शिंदेंना बंड काळात साथ देणारा शिलेदार पडला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातून शहाजीबापू पाटलांचा दारुण पराभव झाला आहे. शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी २५, ३८४ मतांनी शहाजीबापू पाटलांचा पराभव केला आहे.

उद्धव ठाकरेंनी सांगोल्यातील प्रचारसभेत शहाजीबापूंवर टीकेची झोड उठवताना म्हटले की, विद्यमान आमदारांना संधी दिली मात्र त्यांनी संधीची माती केली. त्यानंतर शहाजीबापू जाहीर सभेत म्हणाले होते की, जर मी जिंकलो नाही, तर आत्महत्या करेन. मात्र आता त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. सांगोला मतदारसंघ पूर्वीपासूनच शेकापचा बालेकिल्ला राहिला आहे. गणपतराव देशमुख यांनी ११ वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्याविरोधात शहाजीबापुंनी सहावेळा निवडणूक लढविली होती. २०१९ ला देशमुखांनी वय झाल्याने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर शहाजीबापू पाटलांना संधी मिळाली होती. यावेळी लाडकी बहीण योजना व सत्तेत असल्यामुळे त्यांना आमदारकी कायम ठेवण्याची संधी होती. मात्र आता बाबासाहेब देशमुखांनी पुन्हा हा मतदारसंघ खेचून आणत मतदारसंघात शेकापचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.

निवडणूक जाहीर होताच पुण्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटींची रोकड असलेली गाडी सापडली होती. यामध्ये शहाजीबापूंचा जवळचा कार्यकर्ता असल्याने ही रक्कम त्यांचीच असल्याचे सांगितले जात होते.

शहाजी बापूंचा २५ हजार मतांनी पराभव -

सांगोल्यात शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख २५ हजार ३८४ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना १ लाख १६ हजार २८० मते मिळाली तर शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांना ९० हजार ८९६ मते मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे दीपक आबा साळुंखे तिसऱ्या नंबरवरती राहिले. त्यांना ५१ हजार मते मिळाली.

Whats_app_banner