maharashtra vidhan parishad election 2024 : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळं महाविकास आघाडीत वादाला तोंड फुटलं आहे. शिवसेनेनं चर्चा करून हा निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं. मात्र, त्यांनी परस्पर उमेदवार जाहीर केले. अजूनही वेळ गेलेली नाही. यावर चर्चेतून मार्ग निघू शकतो, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
मुंबतील टिळक भवन इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा विचार आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. अर्ज मागे घेण्यास अजून वेळ असून लवकरच यावर निर्णय होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
'कोकण, मुंबई व नाशिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर व नाशिकच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची भूमिका काँग्रेस पक्षानं जाहीर केली होती. परंतु शिवसेनेनं परस्पर कोकण, नाशिक व मुंबई मतदारसंघासाठीचे उमेदवार जाहीर केले. विधान परिषद निवडणुकीचा निर्णय एकत्र बसून केल्यास महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे चांगलं यश मिळू शकेल यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांना संपर्क केला तेव्हा ते परदेशात होते. आज मातोश्रीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, चर्चेतून मार्ग निघू शकतो, असं नाना पटोले म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली तेव्हा आमच्याकडून दोन उमेदवारांची नावंही मी सांगितली होती. मात्र, नंतर आम्ही सुचवलेल्या संदीप गुळवे यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं शिवबंधन बांधलं आणि त्यांची उमेदवारी जाहीर केली, असं सांगत, ठाकरेंच्या शिवसेनेनं आमचा उमेदवार पळवल्याचं त्यांनी अप्रत्यक्ष सूचित केलं.
नीट परिक्षेत घोटाळा झालेला असून डॉक्टर बनण्याचे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. या परिक्षेचे सर्व नियंत्रण केंद्र सरकारकडे असते, ही परीक्षाच भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे. आपला मुलगा डॉक्टर व्हावा यासाठी पालक लाखो रुपये खर्च करतात पण या भ्रष्टाचारामुळे पालक व विद्यार्थ्यांची घोर निराश होत आहे. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांनी डॉक्टर होऊ नये हे भाजपाचे षडयंत्र आहे. नीट परीक्षा जुन्याच पद्धतीने घेतली पाहिजे अशी मागणी करत नीट परिक्षेत झालेल्या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींना शिक्षा केली पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारला दिलेल्या सल्ल्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोहन भागवत यांनी भाजपा सरकारला काहीही सल्ला दिला तरी ते सरकार मानेल असे वाटत नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
संबंधित बातम्या