Vasai News: पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात हिट अँड रनचा प्रकार घडला. घराबाहेर खेळायला गेलेल्या सहा वर्षाच्या मुलाला कारने चिरडण्यात आले. या घटनेतून मुलगा चमत्कारिकरित्या वाचला. पण त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी सकाळी घडल्याचे सांगण्यात आले असून संपूर्ण प्रकार घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास वसई पूर्वेतील शिव भीम नगर येथील नाईकपाडा परिसरात एका प्रवाशाने ओला ॲपवरून कार बुक केली होती. चालक आणि प्रवासी दोघेही कारमध्ये बसले. त्यावेळी एक सहा वर्षाचा मुलगा कारसमोर येऊन खेळू लागला. त्यानंतर ड्रायव्हरने त्याच्याकडे न बघता मुलाच्या अंगावरून कार पळवली. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर कार चालकाने कार थांबवता तिथून पळ काढला. स्थानिक लोकांनी कारचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक रहिवाशांनी ओला बुक केलेल्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्याने कार चालकाला घेऊन येतो असे सांगितले. मात्र, त्यानंतर त्याने आपला फोन बंद केला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये वळण घेत असताना कॅब चालकाने मुलाला चिरडल्याचे दिसले. आश्चर्याची बाब म्हणजे, अपघातानंतर मुलगा उभा राहिला. त्याच्या शेजारी उभे असलेल्या इतर मुलांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्यानंतर तो घरी निघून गेला.
ताज्या माहितीनुसार, या मुलाला परिसरातील वालदेवी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत मुलाच्या हाताला, डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. स्थानिक पोलीस या घटनेतील कारचालकाचा शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या