Lucknow Woman Harassment Video: लखनौमध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या महिला आणि इतर प्रवाशांना त्रास देणाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी शहराच्या पूर्व विभागातील पोलीस उपायुक्त (डीसीपी), अतिरिक्त डीसीपी आणि सहाय्यक सीपी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, शिवाय संपूर्ण समतामूलक पोलिस चौकी आणि गोमतीनगरचे एसएचओ यांना निलंबित करण्यात आले. २४ तासांत चार आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, गुरुवारी सायंकाळपर्यंत सीसीटीव्हीच्या आधारे एकूण १६ जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती लखनौ पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
लखनौचे पोलिस आयुक्त अमरेंद्र कुमार सेंगर यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पवन यादव आणि सुनील कुमार या दोन आरोपींना बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यानंतर मोहम्मद अरबाज आणि विराज साहू यांना अटक करण्यात आली. राज्य सरकारच्या झिरो टॉलरेंस धोरणाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त करत ही घटना लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री योगी यांच्या सूचनेनुसार डीसीपी ईस्ट, एडीसीपी ईस्ट आणि एसीपी गोमतीनगर यांना निष्काळजीपणाबद्दल पदावरून हटवण्यात आले आहे. याशिवाय गोमतीनगरचे इन्स्पेक्टर, समतामूलक चौकीचे प्रभारी आणि चौकीतील सर्व पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डीसीपी ईस्ट प्रबल प्रताप सिंह, एडीसीपी ईस्ट अमित कुमावत आणि एसीपी गोमतीनगर अंशु जैन यांची तात्काळ बदली करण्यात आली. याशिवाय गोमतीनगरचे निरीक्षक दीपककुमार पांडे, समतामूलक चौकीचे प्रभारी ऋषी विवेक, निरीक्षक कपिल कुमार, कॉन्स्टेबल धर्मवीर आणि कॉन्स्टेबल वीरेंद्र कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती सहपोलिस आयुक्त (गुन्हे) आकाश कुल्हारी यांनी दिली.
दरम्यान, उर्वरित संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. अन्य आरोपींना पकडण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाने १० आरोपींची नावे आणि पत्त्यासह ओळख पटवली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे जेसीपी यांनी सांगितले. डीसीपी ईस्ट पीपी सिंह यांची बदली करून डीसीपी ११२ , एडीसीपी ईस्ट अमित कुमावत यांना मुख्यालयात तर एसीपी गोमतीनगर अंशु जैन यांना एसीपी महिला गुन्हे म्हणून तैनात करण्यात आले आहे.
घटना बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोमती नगर परिसरातील अंडरपासजवळ, ताज हॉटेल आणि शीरोस कॅफेजवळ पाणी साचले होते. त्यानंतर अनेक पावसाचे शौकिन घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पाणी साचलेल्या ठिकाणी प्रवाशांना त्रास देण्यास सुरुवात केली आणि जाताना त्यांच्यावर पावसाचे पाणी शिंपडण्यास सुरुवात केली.
पावसाचा जोर कायम असतानाच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये गुंड दुचाकीस्वार आणि महिलांचा छळ करताना दिसत आहेत. लोकांनी कारच्या खिडक्या, वायपर फोडणे, पथदिवे तोडणे, दुचाकीस्वारांना पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावर ढकलणे अशा घटनाही उघडकीस आल्या. अशाच एका व्हिडिओत काही जण दुचाकीवरून एक महिला आणि पुरुषाला त्रास देताना दिसत आहेत. या घटना घडत असताना घटनास्थळी एकही पोलिस कर्मचारी दिसला नाही आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रकरण पेटले. गोमतीनगरमध्ये आरोपींविरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपींविरोधात बीएनएस २०२३ च्या कलम १९१ (२), ३ (५), २७२, २८५ आणि ७४ (महिलेचा विनयभंग करण्याशी संबंधित) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रचंड टीका केल्यानंतर आणि व्हायरल होऊ लागल्यानंतरच पोलिसांनी कारवाई केली.
राजधानी लखनौमध्ये दिवसाढवळ्या एका महिलेचा छळ केला जात आहे. हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळच घडत आहे. महिलेवर पाणी फेकले जात आहे; तिला बाईकवरून ढकलले जात आहे,' असे निगार परवीनने एक्सवर लिहिले आहे. आयपी सिंह या युजरने लिहिले की, “उत्तर प्रदेशात बहीण-मुली सुरक्षित नाहीत. गुंडांनी एका मुलीला घेरले आणि तिला मोटारसायकलवरून फेकले जाईपर्यंत तिच्याशी गैरवर्तन केले. हा लखनऊचा गोमतीनगर परिसर आहे...”
संबंधित बातम्या