अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कर्मचाऱ्यांनी अंगणवाडीतील मुलांना दिल्या जाणाऱ्या अंड्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि फोटो काढले. व्हिडिओत दिसत आहे की, अंगणवाडी सेविकांनी मुलांना जेवणादरम्यान दिलेली अंडी परत घेताना दिसत आहे. सरकारी शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजनात अंडी हा अनिवार्य भाग आहे. महिला व बालविकास विभागाने ९ ऑगस्ट २०२४ रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन्ही कामगारांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, ही बाब त्यांच्या निदर्शनास येताच तात्काळ कारवाई करण्यात आली आणि दोन्ही कामगारांना निलंबित करण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी कोप्पलच्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आणि कोप्पल जिल्ह्याच्या उपसंचालकांना नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुलांना पोषण आहार देणे आणि समतेचे शिक्षण देणे हे अंगणवाडीचे उद्दिष्ट आहे. वंचित मुलांवर अन्याय होणार नाही, असेही त्या म्हणाल्या. अशा गैरवर्तणुकीत दोषी आढळल्यास त्यांना सक्तीने पदावरून निवृत्त केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जळगावमध्ये काही दिवसांपूर्वी लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मेलेला उंदीर सापडल्याची घटना घडली होती. राज्यातील अंगणवाडी आणि शाळांमधून दिला जाणारा पोषण आहार हा खरंच पोषण आहार आहे की विष आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याप्रकरणी प्रशासनाने दोषींविरोधात कारवाई करण्याचे अश्वासन दिले. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या नशिराबाद येथील अंगणवाडीतून लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात म्हणजेच मिक्स तांदुळाच्या पाकिटात चक्क मेलेला उंदीर आढळला. तेजस्वी देवरे या गृहिणीच्या स्वयंपाकादरम्यान हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. पोषण आहाराच्या पाकिटामध्ये उंदीर सापडल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. याआधीदेखील अनेकदा अशाप्रकारच्या घटना उघडकीस आल्या आहेत.