अजितदादांंनी रोहित पवारांना पाया पडायला सांगितलं; प्रेमानं दटावत म्हणाले… ढाण्या, थोडक्यात वाचलास!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अजितदादांंनी रोहित पवारांना पाया पडायला सांगितलं; प्रेमानं दटावत म्हणाले… ढाण्या, थोडक्यात वाचलास!

अजितदादांंनी रोहित पवारांना पाया पडायला सांगितलं; प्रेमानं दटावत म्हणाले… ढाण्या, थोडक्यात वाचलास!

Nov 25, 2024 12:36 PM IST

Ajit Pawar taunt Rohit Pawar : कर्जत-जामखेडमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून अजित पवार यांनी पुतणे रोहित पवार यांना मिश्किल टोला हाणला आहे.

अजितदादांंनी रोहित पवारांना पाया पडायला सांगितलं; म्हणाले, थोडक्यात वाचलास!
अजितदादांंनी रोहित पवारांना पाया पडायला सांगितलं; म्हणाले, थोडक्यात वाचलास!

Maharashtra election results : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर आता राज्यात वेगवेगळ्या गमतीजमती पाहायला मिळत आहेत. अजित पवार हे आपल्या खास स्टाइलनं विरोधकांची मजा घेत आहेत. कराड येथील प्रीतीसंगमावर काका-पुतण्याच्या भेटीदरम्यान याचाच प्रत्यय आला.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा अवघ्या १,२४३ मतांनी विजय झाला आहे. रोहित पवार यांना १ लाख २७ हजार ६७६ मतं मिळाली. तर, भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांना १ लाख २६ हजार ४३३ मतं मिळाली आहेत. रोहित पवारांनी दुसऱ्यांदा शिंदे यांचा पराभव केला. अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना ३४८९ मतं मिळाल्याचा फटका रोहित पवार यांना बसल्याचं सरळ दिसून आलं. तर, अपक्ष राम नारायण शिंदे यांना ३९२ आणि नोटाला ६०१ मतं मिळाली. रोहित पवारांच्या या निसटत्या विजयाची चर्चा सध्या राज्यात आहे.

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक नेते आज कराडमधील प्रीतीसंगम इथं अभिवादन करण्यासाठी जात आहेत. तिथं अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. त्यावेळी समोरासमोर येताच अजित पवारांनी रोहित पवारांना चिमटा काढला.

'दर्शन घे दर्शन काकाचं, असं अजित पवार रोहित यांना म्हणाले. त्यानंतर रोहित पवारांनी काकांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर अजित पवार म्हणाले, ‘ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं.’ काकांच्या या वाक्याला रोहित पवार यांनी हसून दाद दिली. काका-पुतण्याच्या या भेटीची सध्या राज्यभर चर्चा आहे.

रोहित पवारांनी स्वत: व्हिडिओ केला ट्वीट

रोहित पवारांनी स्वत: हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. 'स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी प्रितीसंगम म्हणजे पवित्र स्थळ. चव्हाण साहेबांनीच एक सुसंस्कृत अशी राजकीय संस्कृती जपण्याचे संस्कार महाराष्ट्रावर केले. त्यानुसारच आज प्रितीसंगमावर आदरणीय अजितदादांची भेट झाली. त्यांची राजकीय वाटचाल स्वतंत्र दिशेनं सुरू असली तरी त्यांचा राजकीय अनुभव आणि वयाचा कायमच आदर आहे. त्यानुसार आजच्या भेटीदरम्यानही निवडणुकीतील यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद घेतले, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Whats_app_banner