Dajisaheb Rohidas Patil death news : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री, खान्देश भूषण दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचं आज (शुक्रवार, २७ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळानं दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात पुत्र आमदार कृणाल पाटील, विनय पाटील असा परिवार आहे. दाजीसाहेबांच्या निधनाबद्दल राजकीय वर्तुळातून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.
वयोमानामुळं रोहिदास पाटील यांच्या प्रकृतीत सातत्यानं चढउतार होत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची फुफ्फुसं कमी क्षमतेनं काम करत असल्याचं निदान झालं होतं. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर अलीकडं पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
रोहिदास पाटील यांची अंत्ययात्रा शनिवार, २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता धुळ्यातील देवपूर येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघेल आणि एस एस व्ही पी एस कॉलेज ग्राउंडवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तत्पूर्वी, सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रोहिदास पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यात पाटील यांचा मोठा वाटा आहे. खान्देश नेते दाजीसाहेब असं स्वत:चं वेगळं वलय निर्माण करणारं काँग्रेसचं धुळे जिल्ह्यातील नेतृत्व आज हरपलं. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करतो, असं शरद पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.