Velhe Taluka Renamed : राज्यातील महायुती सरकारनं जिल्हे, तालुके आणि रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा धडाकाच लावला आहे. मुंबईतील आठ रेल्वे स्थानकं आणि अहमदनगरच्या नामांतरानंतर आता पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचंही नाव बदलण्यात येणार आहे. हा तालुका यापुढं राजगड म्हणून ओळखला जाणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet decisions) आज त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. वेल्हे तालुक्यात राजगड आणि तोरणा हे दोन शिवकाली किल्ले आहेत. यापैकी राजगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. तब्बल २० वर्षे राजगड हा स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जात होता. याच किल्ल्याच्या नावावरून आता वेल्हे तालुका ओळखला जाणार आहे.
उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे गेल्या काही वर्षांपासून या नामांतरासाठी पाठपुरावा करत होते. तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायतींचा यासाठी ठराव घेण्यात आला. त्यानंतर २२ नोव्हेंबर २०२१ रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नामातराच्या शिफारशीचा ठराव मंजूर करण्यात आला. तसंच, पुणे विभागीय आयुक्तांनी तसा प्रस्ताव पुढं पाठवला होता.
राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदी असताना अजित पवार यांनी या संदर्भात २७ एप्रिल २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं. तसंच, नामांतराच्या मागणीवर तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी केली होती. ही मागणी अखेर मान्य झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला. हा निर्णय प्रत्यक्षात येण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांचं व ग्रामपंचायतींचं अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे.