Communal Tension Erupts In Mumbai's Mira Road: अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मुंबईतील मीरा रोडमध्ये रामध्वज असलेल्या वाहनांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, घटनास्थळी पोलीस तैनात आहेत.
अयोध्यातील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये रामध्वज असलेल्या वाहनांवर हल्ला होत आहे. हल्लेखोरांनी काचा फोडून शिवीगाळ केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
डीसीपी जयंत बजबळे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, हिंदू समुदायाचे लोक तीन- चार कारमधून जात असताना ‘जय श्री राम’ अशा घोषणा देत होते. त्यावेळी मुस्लीम समाजातील काही लोकांनी त्यांच्याशी वाद घातला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची गाडी तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि काही लोकांना ताब्यात घेतले. परिस्थिती नियंत्रणात आली असून परिसरात फ्लॅग मार्च काढण्यात आला. नया नगर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
“हा जातीय हिंसाचार नसून किरकोळ भांडण होते जे वादातून झाले. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मी जनतेला करेन”, असे डीसीपी म्हणाले आहेत.