मुंबईत हाजी अली चौकातून वाहनाने प्रवास करणाऱ्यांना सध्या एक विचित्र अनुभव येतोय. या चौकातून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांवर विविध रंगांच्या पेंटची जणू फवारणी होत असल्याचे दिसून येत आहे. वाहनाला चिकटलेलं पेंट पुसून काढण्यासाठी वाहनचालकांना तब्बल पाच ते तीस हजार रुपयापर्यंतचा भूर्दंड सहन करावा लागत असल्याचं वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलं आहे.
दक्षिण मुंबईतील कार वर्कशॉपमध्ये गेल्या काही महिन्यांत अशाप्रकारची अनेक वाहने रंगसफाईसाठी दाखल झाली आहे. या घटनेचा बारकाईने अभ्यास केला असता असं लक्षात आलं की रंगाचे ठिपके पडलेली ही सर्व वाहने मुंबईच्या हाजी अली चौकातून कधी ना कधी गेलेली होती. हाजी अली चौकात सध्या कोस्टल रोडचे काम मोठ्या धड्याक्यात सुरू असून याच ठिकाणी वाहनांवर पेंटचे ठिपके शिंपडले जात असल्याचं दिसून आलं आहे.
मुंबईत केम्प्स कॉर्नर येथील ‘द डिटेलिंग स्टुडिओ’ या कार रिस्टोरेशन कंपनीचे संस्थापक जय दिवेचा यांनी आतापर्यंत अशा एकूण ६० वाहनांवर पडलेले पेंटचे ठिपके काढण्याचे काम केले आहे. दिवेचा यांनी यापूर्वी देशातील अनेक नामवंत क्रीडापटू आणि सेलिब्रेटीच्या कारचे काम सुद्धा केले आहे. ते म्हणतात, ‘बऱ्याचदा ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार पांढऱ्या किंवा हलक्या रंगाची कार खरेदी करतात. आणि नेमक्या अशा कारवर पडणाऱ्या पेंटच्या ठिपक्यांमुळे त्यांना अतिरिक्त नुकसान सोसावं लागतय.’ महालक्ष्मी येथील ‘फोर सॅटो’ या कार वर्कशॉपचे मालक ललित जोगणी यांनी सुद्धा अशाच प्रकारचे पेंटचे ठिपके असलेल्या किमान पाच वाहनांची दुरुस्ती केल्याचं सांगितलं.
नवी कोरी वाहने अशी पेंट शिंपडल्यासारखी खराब का होताएत, याची सखोल चौकशी केली असता वेगळंच कारण समोर आलं आहे. मुंबईत कोस्टल रोडचे काम सध्या जोरात सुरू असून हाजी अली या भागात कोस्टल रोडच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. रंग देताना समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे रंग हवेत उडत असल्याने खालून जाणाऱ्या वाहनांवर रंगाचे ठिपके पडत आहे. पेंटचे अगदी छोटे छोटे ठिपके वाहनांवर सर्वत्र पडत असल्याने बहुतेकांना हे लवकर लक्षात येत नाही. परंतु काही दिवसानंतर हा रंग अधिक कडक होत जातो आणि नंतर रंग साफ करणे अवघड होऊन जाते, असं जोगणी यांनी सांगितलं.
दक्षिण मुंबईतील माधव नावाच्या एका कार चालकाला असाच अनुभव आला आहे. ते दररोज गोवालिया टँक येथून ऑपेरा हाऊसमधल्या आपल्या ऑफिसला कारने जात असतात. परंतु गेल्या पंधरवड्यात त्यांनी काही वेळा बीकेसीला जाण्यासाठी हाजी अली चौकातून कारने प्रवास केला. त्यांना त्यांच्या नव्याकोऱ्या निळ्या रंगाच्या मिनी कूपर कारच्या विंडशील्डवर काही काळे ठिपके पडल्याचे लक्षात आले. प्रथम त्यांनी धूळ असल्याचं समजून दुर्लक्ष केलं. नंतर ते ठिपके कापडाने पुसण्याचा प्रयत्न केला असता घट्ट चिकटले असल्याचं दिसून आलं. परिणामी कार वर्कशॉपमध्ये नेऊन पेंटचे ठिपके काढावे लागले. पराग या वाहनचालकाला असाच अनुभव आल्याचे सांगितले. त्यांच्या नेक्सॉन ईव्ही आणि स्पोर्ट्स कारवरील पेंटचे ठिपके जोगणी यांच्या वर्कशॉपमध्ये पुसण्यात आली. पॅच-बाय-पॅच स्टीम ट्रीटमेंटद्वारे वाहनांवर पडलेले पेंटचे ठिपके काढून नंतर पॉलिश केलं जातं, असं जोगणी यांनी सांगितले. या कार मालकांना वाहनांवर पडलेला पेंट काढण्यासाठी प्रत्येक वाहनाला १५ हजार रुपये खर्च करावा लागला आहे. मोठ्या कारवरील ठिपके काढण्यासाठी ३० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.
दरम्यान, कोस्टल रोड प्रकल्पाचे मुख्य अभियंता मंतय्या स्वामी यांनी हाजी अली मार्गावरील कोस्टल रोडवर सध्या रंगरंगोटीचे काम सुरू असल्याचे सांगितले. वाहने खराब होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन ते कसे रोखता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
संबंधित बातम्या