vegetable rates hike : घाऊक बाजारात मागणी वाढल्याने कांदा, बटाटा, लसूण, भेंडी, गवार, कोबी, शेवगा या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. शेवगा ५० रुपये पाव तर लसूण ५०० रुपये प्रती किलोच्या पुढे गेले आहे. हिरवी मिरची, ढोबळी मिरची, घेवड्याच्या दरात घट झाली आहे, तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती पुणे मार्केट यार्ड मधील व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
सध्या भाज्यांचे दर तेजीत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेला अवकाळी पावसामुळे तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी आता बाजारात भाज्यांची हवी तशी आवक होत नाही. आवक कमी असल्याने दर वाढले आहे. शेवगा तर ५० रुपये पाव तर लसूण ५०० रुपये किलोच्या पुढे गेला आहे.
पुणे मार्केट यार्डमधील लसूण व्यापारी समीर रायकर म्हणाले, गेल्या हंगामात लसणाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. परिमाणी बाजारात लसणाचा तुटवडा आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने लसणाचे भाव उच्चांकी वाढले आहेत. सध्या किरकोळ बाजारात एक किलो लसणाचे दर ४०० ते ५०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. हे दर पुढील दोन महीने तेजीत राहण्याची शक्यता आहे.
भाज्यांमध्ये भेंडी ८० रुपये किलो, वांगी ८० रुपये किलो, बटाटा ५० ते ६० रुपये किलो, मेथी जुडी ३० रुपये, पालक जुडी ३० रुपये, तर कोथिंबीर जुडी २० ते ३० रुपये दराने विकली जात आहे. टोमॅटो देखील ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. व्यापारी विलास भुजबळ म्हणाले, सध्या भाज्यांची मागणी वाढली आहे. नव्या भाज्यांची आवक अजून मागणी प्रमाणे होत नसल्याने दर तेजीत आहे. पुढील १० ते १५ दिवसांत नवा माल बाजारात दाखल होणार असून यानंतर भाज्यांचे दर नियंत्रणात येतील, अशी आशा आहे.