अयोध्येतील भव्य-दिव्य राममंदिराच्या उद्घटनाचा कार्यक्रम केवळ चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रभू रामाची मूर्ती आज पहिल्यांदाट कार्यशाळेतून अयोध्येत दाखल झाली आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून देशभरातील जवळपास २० हजार व्यक्तींना निमंत्रणे पाठवण्यात आले आहे. अवघा देश राममय झाला असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राम मंदिर उद्घाटनाबाबत मोठे विधान केले आहे.
राम मंदिर ट्रस्टकडून प्रकाश आंबेडकरांना उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र हा धार्मिक सोहळा निवडणुकीच्या फायद्यासाठी राजकीय प्रचाराचा मुद्दा बनला आहे, असं म्हणत आंबेडकरांनी सोहळ्याला जाण्यास नकार दिला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी सोशल मीडिया प्लेटफार्म एक्सवर पोस्ट केले आहे. त्यात प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे की, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मला आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. परंतु या धार्मिक सोहळ्यासाठी मी सहभागी होणार नाही. कारण देशातील सत्ताधारी पक्ष भाजपा आणि आरएसएसने या सोहळा आपल्या हातात घेतला आहे.
एका धार्मिक सोहळ्याचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात आहे. माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे जर राजकीय पक्ष धर्म, पंथ याला देशापेक्षा सर्वोच्च ठेवतील तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येऊ शकते. कदाचित हे स्वातंत्र्य आपण कायमचे गमावून बसू असं त्यांनी सांगितले होते. सांगितले होते.
बाबासाहेबांनी जी भीती व्यक्त केली होती ती आज खरी ठरताना दिसत आहे. धर्म, पंथ याला देशापेक्षा सर्वोच्च ठेवणाऱ्या भाजपा आणि आरएसएसने त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या सोहळ्याचा वापर केला आहे. अशी नाराजी प्रकाश आंबेडकरांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.