मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘आरे’विरोधात आता प्रकाश आंबेडकरांचे ‘कारे’..मेट्रो कारशेडविरोधात आंदोलनाची घोषणा

‘आरे’विरोधात आता प्रकाश आंबेडकरांचे ‘कारे’..मेट्रो कारशेडविरोधात आंदोलनाची घोषणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 05, 2022 09:12 PM IST

शिंदे सरकारने गोरेगावमधील आरे जंगलात मेट्रो कारशेड बांधण्याचा घाट घातला आहे. त्याविरोधात मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी आंदोलन करण्यात येत आहे.

कारशेडविरोधात वंचितकडून आंदोलनाची घोषणा
कारशेडविरोधात वंचितकडून आंदोलनाची घोषणा

मुंबई – अहमदाबाद-मुंबई मेट्रोचे कारशेड महाविकास आघाडी सरकारने आरे येथून हलवून कांजुरमार्गला हलवले होते. त्यानंतर सत्तांतर झाले आणि शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारचा मुंबईतील मेट्रो ३ कारशेडबाबतचा निर्णय रद्द करत कारशेड कांजुरमार्गहून पुन्हा आरे कॉलनीच्या परिसरातच करण्याचा निर्णय घेतला. याला शिवसेनेने जोरदार विरोध केला. याशिवाय आरेमधील स्थानिक रहिवाशांनीही याविरोधात आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. आता वंचित बहुजन आघाडीनेही आंदोलनाची घोषणा केली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (७ ऑगस्ट) रोजी आरे बचावासाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिंदे सरकारने गोरेगावमधील आरे जंगलात मेट्रो कारशेड बांधण्याचा घाट घातला आहे. त्याविरोधात मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी (७ ऑगस्ट) आंदोलन करण्यात येत आहे. आरेचं जंगल मुंबईच्या ऑक्सिजनचा मोठा स्रोत आहे. ऑक्सिजन निर्माण करणारं हे जंगल संपलं, तर मुंबईत राहणं मुश्किल होईल. म्हणून मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी रविवारच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.

मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे वसाहतीतील वृक्ष तोडण्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वृक्षतोडीविरोधात निर्देश दिले आहेत. मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील आरे कारशेडच्या कामासाठी पुढील सुनावणीपर्यंत आरेतील एकही झाड कापू नये असे निर्देश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ला दिले. पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.

WhatsApp channel