Vasant Vyakhyanmala News : महाराष्ट्रातील वैचारिक मंथनाची आणि चिंतनाची परंपरा पुढं नेणाऱ्या काही मोजक्या उपक्रमांमध्ये व्याख्यानमालांचा समावेश होतो. मुंबईतील बोरिवली पूर्वेकडील जय महाराष्ट्र नगरात होणारी वसंत व्याख्यानमाला ही त्यापैकीच एक. गेल्या ४१ वर्षांपासून जिज्ञासू व अभ्यासकांना बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करणारी ही व्याख्यानमाला यंदा मंगळवार, २१ मे २०२४ पासून सुरू होत आहे.
अनेक नामांकित तज्ज्ञ व विविध क्षेत्रातील जाणकार या व्याख्यानमालेत आपले विचार मांडणार आहेत. ‘एक संध्याकाळ शाहिरांसमवेत’ या कार्यक्रमानं वसंत व्याख्यानमालेचा शुभारंभ होणार आहे. लोककलेचे गाढे अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमर शेख अध्यासनाचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे आणि त्यांचे सहकारी पहिल्या दिवशी पोवाडे सादर करतील.
बुधवार, २२ मे २०२४ रोजी 'मी भारतीय' या विषयावर पुण्याचे रवींद्र देवधर हे दीर्घांक सादर करून आपण सारे भारतीय आहोत ही त्यांची महत्वपूर्ण संकल्पना मांडतील. गुरुवार, २३ मे २०२४ रोजी चॉकलेट हिरो देव आनंद ही संकल्पना घेऊन ख्यातनाम चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर हे देव आनंद यांच्या सदाबहार अभिनेत्याच्या आठवणी, किस्से आपल्या खुमासदार शैलीत रसिक प्रेक्षकांसमोर सादर करतील तर संगीत संयोजक संतोष पिसाट आणि प्रमोद कुंभार हे देव आनंद यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील निवडक गाणी सादर करतील.
शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी आपल्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या राजधानीवर तब्बल ५०० वेळा जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा खराखुरा परिचय शिवभक्तांना करून देत एक ऐतिहासिक विक्रम पूर्ण केला आहे. या त्यांच्या रायगड दर्शन @५०० निमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी त्यांच्या विशेष प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य आणि प्रा. नयना रेगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यंदा ही वसंत व्याख्यानमाला ४२ वर्षांची होत आहे. हे औचित्य साधून शनिवार, २५ मे २०२४ रोजी प्रख्यात निवेदिका मंगलाताई खाडिलकर या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रसिक श्रोत्यांशी थेट संवाद साधतील. रोज सायंकाळी ७.३० वाजता ही वसंत व्याख्यानमाला सुरू होणार असून श्रोतृवृंदांनी वेळेआधी आपापले स्थान ग्रहण करून या बौद्धिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.