Vasant More Facebook Post : पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. मोरे हे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, पक्षाने या बाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. वसंत मोरे हे अनेकदा सोशल मिडियावरून व्यक्त होत असतात. दरम्यान, मध्यरात्री वसंत मोरे यांनी लिहिलेली फेसबूक पोस्ट सध्या चर्चेत आहे. एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टमुळे सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
वसंत मोरे हे नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. मोरे हे पुण्यात मनसेचे धडाडीचे नेते म्हणून ओळखले जातात. नगरसेवक म्हणून त्यांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांनी पुण्याच्या राजकारणात त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्यामुळे पुण्यात मनसेचा विस्तार झाला. मात्र, पक्षातील अंतर्गत राजकरणामुळे मोरे सध्या नाराज आहेत. वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मोरेंनी त्यांची तयारी देखील सुरू केली आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्यात त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली होती.
मात्र, पक्षाने अद्याप या बाबत कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे त्यांनी मध्यरारी १२ वाजता फेसबूक पोस्ट लिहून त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. वसंत मोर यांनी पोस्ट मध्ये लिहिले आहे की, एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो.
त्यांच्या या पोस्टमुळे ते नाराज असल्याचे उघड झाले आहे. या सोबतच पक्षात त्यांना कोण त्रास देत आहे हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. मोरे हे इतरांच्या समस्या धडाडीने सोडवतात. मात्र, पक्षातील त्यांचे प्रश्न ते अद्याप सोडवू शकलेलेनाही. त्यांना कोणता त्रास आहे? त्यांची कोंडी कोण करतंय? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच त्या बैठकीत वसंत मोरे पोहोचल्याने पुण्यात राजकीय चर्चाना उधाण आले होते. ते मनसेला रामराम करून राष्ट्रवादीत जाणार अशी देखील चर्चा रंगली होती.
संबंधित बातम्या