Vasai News : वसईतील एका कंपनीत दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. कंपनीत कामाला असणाऱ्या काहींनी महिलांच्या पिण्याच्या बाटलीत लघवी केल्याचा आरोप करण्यात आला होता. कंपनीत कामाला असलेल्या एका महिलेने पाणी समजून ते प्यायल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी कंपनीत काम करणाऱ्या तीन मुलींनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र, हा प्रकार खोटा आणि बनाव असल्याचं निष्पन्न झालं आहे. कामगार मुलींनी हा बनाव का रचला ? याचं देखील कारण पुढं आलं आहे.
वसई पूर्वेच्या नवघर येथे इमिटेशन ज्वेलरी बनाविण्याचा एक छोटा कारखाना आहे. या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या तीन तरुणींनी दोन दिवसांपूर्वी माणिकपूर पोलिस ठाण्यामध्ये पाण्याच्या बाटलीत लघुशंका केल्याची तक्रार दिली होती. कंपनीत रात्री झोपायला येणाऱ्या कामगारानीच हे किळसवाणं कृत्य केल्याचा आरोप मुलींनी केला होता. या कंपनीच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या कंपनीतील कामगार येथे रात्री झोपण्यासाठी येतात. त्यांनी हे कृत्य केल्याचा मुलींनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं होतं. याची तक्रार त्यांनी कंपनी मालकाला देखील केली होती. मात्र, मालकाने हा प्रकार चुकीचा असल्याचं म्हटलं होतं. मालकाने यावर काहीच कारवाई न करता उलट मुलींवरच संशय घेतला होता. यानंतर संतापलेल्या मुलींनी थेट वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात जात आरोपी कर्मचारी व कंपनीच्या मालकावरही कारवाई करण्याची लेखी तक्रार दिली होती. पोलिसांनी कंपनीत रात्रपाळीत काम करणाऱ्या सर्व कामगारांची चौकशी सुरू केली. मात्र, त्यांना काही आढळलं नाही. यानंतर त्यांनी मुलींची उलटतपासणी घेतली. यात त्यांनी हा बनाव रचल्याचं कबूल केलं. या प्रकारामुळे पोलिसांना आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
तक्रार करणाऱ्या या मुलींना कंपनीमालकाने पगार दिला नव्हता. त्यांना हा पगार मिळावा व कंपनीमालकाला धडा शिकवण्यासाठी त्यांनी हा बनाव रचला. या प्रकरणी आता कंपनीचे कर्मचारी, मालक व तक्रारदार तरुणींची सविस्तर चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी मुलींना चौकीशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास माणिकपूर पोलीस करत आहेत.