आचार्य अत्रे यांचा'लखोबा लोखंडे' मराठी रंगभूमीवरील अजरामर पात्र आहे. नाटकांमध्ये तो अनेक महिलांना फसवत असे मात्र असाच लखोबा वसईत वास्तवात वावरत असल्याचे समोर आले आहे. याने एक-दोन नव्हे तर तब्बल २५ लग्नं करून या सर्व बायकांनालाखो रुपयांचा गंडा घातला आहे. फिरोज नियाज शेख (वय ४३) असेया'लखोबा'चं नाव आहे.
आरोपी फिरोजने तब्बल २५ महिलांशी विवाह करून त्यांच्याकडून पैसे उकळले. मात्र एका लग्नामुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला.फिरोज शेख याने२०१५ मध्ये एकाच वर्षात ४ महिलांशी लग्न केले. २०२३ मध्ये त्याला ६ वेळा तुरुंगवास भोगावा लागला मात्र त्यानंतरही फसवणूक सुरूच ठेवत २५ महिलांना त्याने गळाला लावले.
फिरोजने मॅट्रिमोनियल साईटवरून एका महिलेशी ओळख झाली. त्यानंतर तिच्याशी लग्न केले व तिच्याकडून लॅपटॉप व कार घेण्यासाठी ६ लाख ५० हजार ७९० रुपये घेऊन तो पसार झाला. महिलेने नालासोपारा पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केले. मात्र पोलिसांना त्याचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. मग पोलिसांनी अनोखी शक्कल लठवून महिलेच्या नावाने फेक प्रोफाईल बनवून त्याला भेटायला बोलावले. त्यानंतर तो आपूसकच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
नालासोपारा पोलिसांनी त्याला जेरबंद करत त्याच्याकडून ३ लाख २१ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यामध्ये अनेक महिलांचे एटीएम कार्ड, चेकबुक, ६ मोबाईल, १ लॅपटॉप, महिलांचे पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, सोन्या-चांदीचे दागिने यांचा समावेश आहे.
फरोज १२ वी पर्यंत शिकलेला असून नोकरी धंदा काही न करता महिलांशी फसवणूक करून त्यांच्या पैशांवर उदरनिर्वाह करत होता. त्याच्या नावावर एकही मोबाईल नव्हता महिलांचे फोन घेऊनच तो इतर महिलांशी संभाषण करायचा. महिलांना फूस लावण्याकामी त्याच्यासोबत एक महिला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
फिरोज घटस्फोटीत व विधवा महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. आतापर्यंत त्याने २५ महिलांची फसवणूक करत लग्न केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली. मॅट्रिमोनियल वेबसाईटवर तो घटस्फोटित आणि विधवा त्याचबरोबर निराधार महिलांना हेरत असे. त्यांच्याशी ओळख वाढवून लग्नाचा प्रस्ताव द्यायचा व महिलेनी मान्य केल्यास लग्न करायचा. त्यानंतर काही दिवसात महिलेचे पैसे, सोने व अन्य किमती सामान घेऊन पसार व्हायचा. मात्र बदनामी व समाजात असलेला एकाकीपणा यामुळे त्याच्याविरोधात आतापर्यंत कोणत्याच महिलेने तक्रार दिली नव्हती. मात्र, नालासोपाऱ्यातील महिलेने धाडस दाखवत त्याला तुरुंगात पाठवला. पोलिसांनी त्याला वसई न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संबंधित बातम्या