Vasai News: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत हिट अँड रनच्या अनेक घटना घडल्या असताना वसईमध्ये एका भरधाव बाईकच्या धडकेत एका १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर दुचाकीस्वारने मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी वसई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहिस्ता इम्रान शाह (वय, १४) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती वसई पश्चिमेतील पापडी परिसरात वास्तव्यास होती. शाहिस्ता नेहमीप्रमाणे शाळेतून घरी जात असताना वसई पश्चिम येथील गोन्साल्विस गार्सिया कॉलेजसमोरील रस्त्यावर एका भरधाव बाईकने तिला धडक दिली. या अपघातात शाहिस्ता गंभीर जखमी झाली. त्यानंतर दुचाकीस्वारने तिला रुग्णालयात नेण्याऐवजी बाईक घटनास्थळी सोडून तिथून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, रोहित जाधव असे दुचाकीस्वारचे नाव आहे. वसई पोलिसांनी आरोपीची दुचाकी ताब्यात घेतली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दिली.
देशात गेल्यावर्षी १ लाख ७० हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर, ४ लाख ६३ हजार लोक जखमी झाले आहेत. २०२२ च्या तुलनेत ही संख्या ४ टक्क्यांनी वाढली आहे. देशात दर तीन मिनिटाला एकाचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रासह एकूण २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये वाढ रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे, यात उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि तेलंगणा यांसारख्या राज्याचा समावेश आहे. देशात सर्वाधिक अपघाती मृत्युंची नोंद तामिळनाडूत (१८ हजार ३४७) करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात २०२३ मध्ये १५ हजार ३६६ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. तर, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे १३ हजार ७९८ आणि १२ हजार ३२१ हजार मृत्युची नोंद झाली. तामिळनाडूत जखमींची (७२ हजार २९२) संख्या मोठी आहे.
संबंधित बातम्या