Bandra East Vidhan Sabha Constituency : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे. ही जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार असून तिथून युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई निवडणूक लढणार आहेत. त्यांचा सामना विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांच्याशी होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणूक राज्यातील सर्वच पक्षांसाठी व त्यांच्या प्रमुख नेत्यांसाठी महत्त्वाची आहे. त्यातही मुंबईवरील वर्चस्वासाठी अटीतटीची लढत होणार आहे. विधानसभा निवडणुकीतील कामगिरीवर मुंबई महापालिकेत काय होणार याचा अंदाज येणार आहे. त्यामुळंच प्रत्येक पक्ष इथं विचार करून आणि तोलूनमापून उमेदवार उतरवण्याच्या प्रयत्नात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ही निवडणूक आणि मुंबईतील जागा अनेकार्थांनी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळंच प्रत्येक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार उतरण्याचा कवायत पक्षाकडून सुरू आहे. ठाकरे परिवाराचे मातोश्री हे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्वसाठी पक्षानं वरुण सरदेसाई यांचं नाव निश्चित केलं आहे.
आमदार अनिल परब यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना ही माहिती दिली. 'आम्ही उद्धव साहेबांशी चर्चा केली आहे. त्यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघासाठी वरुण सरदेसाई यांचं नाव निश्चित केलं आहे, असं अनिल परब म्हणाले. अर्थात, अधिकृत घोषणा नंतरच होणार आहे.
वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. सध्या ते युवा सेनेचं काम पाहतात. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेनं जोमानं प्रचार केला होता. नुकतीच झालेली मुंबई विद्यापाठातील सिनेटची निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वाखाली जिंकली होती. तेव्हापासूनच त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली होती. आता त्यांचा मतदारसंघही निश्चित झाला आहे.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात सध्या झिशान सिद्दीकी हे आमदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव केला होता. ते पुन्हा इथून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. झिशान सिद्दीकी हे सध्या अजित पवार यांच्या पक्षात आहेत. त्यामुळं आता त्यांच्यामागे काँग्रेसची ताकद नसेल. शिवाय बाबा सिद्दीकी यांच्या पश्चात त्यांना ही निवडणूक लढवणं सोपं राहिलेलं नाही. त्यामुळं या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या