वर्षा गायकवाड यांचं निवडणूक आयोगाला पत्र, आशिष शेलारांविरोधात कारवाईची मागणी, कारण काय?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वर्षा गायकवाड यांचं निवडणूक आयोगाला पत्र, आशिष शेलारांविरोधात कारवाईची मागणी, कारण काय?

वर्षा गायकवाड यांचं निवडणूक आयोगाला पत्र, आशिष शेलारांविरोधात कारवाईची मागणी, कारण काय?

Oct 19, 2024 08:42 PM IST

Varsha Gaikwad on Ashish Shelar: काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.

वर्षा गायकवाड यांची आशिष शेलारांविरोधात कारवाईची मागणी
वर्षा गायकवाड यांची आशिष शेलारांविरोधात कारवाईची मागणी

Maharashtra Assembly Election 2024: मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना 'व्होट जिहाद' असा शब्दप्रयोग केला, जे संविधानाने मतदाराला दिलेला हक्क आणि अधिकारचे उल्लंघन असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

वर्षा गायकवाड यांनी राज्य निवडणूक आयगोला लिहिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, 'महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका पत्रकार परिषदेतच व्होट जिहादसारखे वक्तव्य केल्यास त्या व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई केली जाईल असे आपण जाहीर केले होते. भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवली जात आहेत. तसेच धारावीकरांचा उपयोग करून मुंबईत व्होट जिहाद केला जात आहे, असे वक्तव्य केले.'

'राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेते व्होट जिहाद असा शब्दप्रयोग करून एका विशिष्ट धर्माचा अपमान करत आहेत. निवडणुकीत कोणी कोणाला मतदान करायचे? हा त्या मतदाराचा अधिकार आहे. एखाद्या मतदाराने किंवा काही भागातील बहुसंख्य मतदारांनी मतदान केले असेल तर, त्याला व्होट जिहाद म्हणण्याचा कोणालाही अधिकार नाही. संविधानाने मतदाराला दिलेला हक्क आणि अधिकाराचे हे उल्लंघन आहे', असे त्यांनी म्हटले आहे.

'भारतीय जनता पक्षाचे नेते अशा पद्धतीने विशिष्ट धर्माच्या लोकांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत. संविधानाने त्यांना दिलेल्या मतदानाच्या हक्कावर गदा आणत आहेत. अशा प्रकारे भाजप धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. आशिष शेलार यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी', अशी विनंती वर्षा गायकवाड यांनी केली.

आशिष शेलार काय म्हणाले?

शहरी नक्षलवादांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लढाई ही अदानीसाठी आहे. परंतु आमची लढाई धारावीतील गरिबांच्या घरासाठी आहे. धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबई व्होट जिहाद केला जातोय, असे वक्तव्य आशिष शेलार यांनी केले होते.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर