नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस २ दिवस रद्द! रेल्वे प्रशासनाने १५ दिवसातच का घेतला निर्णय?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस २ दिवस रद्द! रेल्वे प्रशासनाने १५ दिवसातच का घेतला निर्णय?

नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस २ दिवस रद्द! रेल्वे प्रशासनाने १५ दिवसातच का घेतला निर्णय?

Updated Oct 02, 2024 06:20 PM IST

Vande bharat update : नागपूर ते सिकंदराबाद आणि सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस प्रत्येकी दोन दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. काझीपेठ –बल्लारशाह दरम्यान इलेक्ट्रॉनिक नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस दोन दिवस रद्द
नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस दोन दिवस रद्द

देशात वंदे भारत ट्रेन खूपच लोकप्रिय होत आहे. सध्या देशभरात ६६ मार्गावर वंदे भारत ट्रेन धावत आहेत. १६ सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे तसेच ८० ट्क्के गाडी रिकामीच धावत असल्याचे समोर आले आहे. यामुळे ही एक्सप्रेस कायमची रद्द केली जाण्याची किंवा २० बोगींवरून ही गाडी ८ बोगींची केली जाण्याची चर्चा सुरू असतानात आता ही गाडी दोन दिवस रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर ते सिकंदराबाद आणि सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस प्रत्येकी दोन दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस २ आणि ३ ऑक्टोबरला तर सिकंदराबाद- नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ५ आणि ६ ऑक्टोबरला धावणार नाही. १६ सप्टेबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या गाडीला १५ दिवसातच काही दिवस रद्द करण्याची वेळ आली आहे.

दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या काझीपेठ – बल्लारशाह दरम्यान रेल्वेमार्गावरील हसनपर्थी स्थानकावर इलेक्ट्रॉनिक नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन दिवस नागपूरहून निघणारी आणि दोन दिवस सिकंदराबाद निघणारी वंदे भारत एक्सप्रेस रद्द करण्यात येत आहे.

१६ सप्टेंबर रोजी मोदींनी देशभरात जवळपास अर्धा डझन वंदे भारत रेल्वे गाड्यांचे लोकार्पण केले होते. त्यात भारतात दुसरीच २० डब्यांची नारंगी रंगाची वंदे भारत एक्सप्रेस नागपूर-सिकंदराबाद-नागपूर या मार्गावर सुरू केली होती. नागपूर ते सिकंदराबादचे अंतर कापण्यासाठी वंदे भारत ट्रेनला केवळ ७ तास १५ मिनिटांचा कालावाधी लागत असल्याने प्रवाशांच्या वेळेची बचत होत आहे. ही गाडी नागपूरहून पहाटे ५ ला निघते आणि दुपारी सव्वा बारा वाजता सिकंदराबादला पोहोचते. १३० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी ही गाडी नागपूरहून निघाल्यानंतर सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामागुंडम आणि काझीपेठ स्थानकांवर थांबते. त्याचदिवशी वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबादहून दुपारी १ वाजता निघते आणि नागपूरला रात्री ८.२० वाजता पोहोचते. सध्या नागपूरहून नागपूर -सिकंदराबाद, नागपूर- बिलासपूर आणि नागपूर इंदूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. लवकरच नागपूर-पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर