Vande Bharat News : देशातील सर्वात लोकप्रिय ट्रेन वंदे भारत सध्या चर्चेत आहे. रेल्वे विभागही या ट्रेनबाबत खूप उत्सुक आहे. ही गाडी रेल्वेकडून वेगवेगळ्या मार्गांवर चालवली जात आहे. ही गाडी विविध मार्गांवर धावत असल्याने प्रवाशांमध्येही नवा उत्साह आहे. 'वंदे भारत'च्या बहुतांश गाड्या फुल्ल असताना नुकत्याच सुरू झालेल्या सिकंदराबाद-नागपूर वंदे भारतला प्रवाशांची कमतरता भासत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ट्रेनमध्ये ८० टक्क्यांहून अधिक जागा रिकाम्या रहात आहेत, ज्यामुळे रेल्वे अधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत. विदर्भ आणि तेलंगणातील रामागुंडम, काझीपेट आणि सिकंदराबाद या औद्योगिक केंद्रांना जोडण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आलेली तेलंगणातील ही पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस आहे.
गाडी क्रमांक २०१०२ वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये १४४० पैकी १२०० जागा रिक्त असल्याने प्रवाशांची संख्या केवळ २० टक्क्यांवर आली आहे. रविवारी ट्रेन सुटण्याच्या काही तास आधी १२०० जागा रिकाम्या होत्या. विशेष म्हणजे एक्झिक्युटिव्ह क्लासमधील ८८ जागांपैकी केवळ १० जणांचे बुकिंग झाले होते.
याउलट हैदराबादहून बेंगळुरू, चेन्नई आणि विशाखापट्टणमला जाणाऱ्या वंदे भारत गाड्यांना चांगला प्रतिसाद असून, या मार्गांवरील गाड्यांची ऑक्यूपेंसी ९० ते १०० टक्क्यांच्या दरम्यान आहे. विशाखापट्टणम वंदे भारत एक्स्प्रेसची तिकिटे सोमवारी प्रतीक्षा यादीत होती, ज्यावरून या गाड्यांची लोकप्रियता स्पष्टपणे दिसून येते.
सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल बोलायचे झाले तर ही ट्रेन आपला प्रवास ७ तास १५ मिनिटांत पूर्ण करते. या गाडीत दोन एक्झिक्युटिव्ह कोच आणि १८ चेअर कार कोच असून एकूण १४४० सीट आहेत. ही गाडी काझीपेट, रामागुंडम, बल्लारशहा, चंद्रपूर आणि सेवाग्राम येथे थांबते. प्रवाशांची कमतरता अशीच कायम राहिल्यास रेल्वेच्या डब्यांची संख्या २० वरून ८ वर येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असे केल्याने या गाडीत केवळ ५०० जागा शिल्लक राहतील.
नागपूर सिकंदराबाद वंदे भारत मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावते. ५७५ किलोमीटरचे अंतर अवघ्या ७ तास १५ मिनिटांत पार करते. या ट्रेनचा वेग ताशी ७९ किमी आहे. नागपूरहून येणारी ही गाडी सात स्थानकांवर थांबते. यामध्ये नागपूर जंक्शन, सेवाग्राम जंक्शन, चंद्रपूर, बल्लारशहा, रामागुंडम, काझीपेट जंक्शन आणि सिकंदराबाद जंक्शन यांचा समावेश आहे.
नागपूर जंक्शनवरून ही गाडी पहाटे पाच वाजता सुटते व पहिल्या स्टॉप सेवाग्राम जंक्शनवर ५ वाजून ४३ मिनिटांनी पोहोचते. त्यानंतर ७.०३ वाजता चंद्रपूर, ७.२० वाजता बल्लारशहा पोहोचते. पुढचा स्टॉप रामागुंडम आहे, जिथे ट्रेन ९.०८ वाजता पोहोचते. त्यानंतर सकाळी १०.०४ वाजता काझीपेटला पोहोचते आणि शेवटी १२.१५ वाजता सिकंदराबादला पोहोचते. परतीच्या प्रवासात ही गाडी सिकंदराबादहून दुपारी १ वाजता सुटते आणि रात्री ८.२० वाजता नागपूरला पोहोचते.