मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vande Bharat Train : मुंबईत 'या' भागात होणार १० सुपरफास्ट वंदे भारत ट्रेनची एकाच वेळी चकचकीत सफाई

Vande Bharat Train : मुंबईत 'या' भागात होणार १० सुपरफास्ट वंदे भारत ट्रेनची एकाच वेळी चकचकीत सफाई

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Feb 08, 2024 12:40 PM IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात २० लाख रुपयांचा निधी मंजुर केला होता. हा निधी पश्चिम रेल्वेला नुकताच प्राप्त झाला आहे. वंदे भारतसाठीचा डेपो मुंबईत जोगेश्वरी ते राम मंदिर रेल्वे स्थानकांदरम्यान उभारण्यात येणार आहे.

Vande Bharat Express train
Vande Bharat Express train (HT_PRINT)

रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला उतरलेल्या वंदे भारत ट्रेनला देखभालीसाठी मुंबईत हक्काचं ठिकाण मिळालं असून यासाठी वाडीबंदर नंतर आता जोगेश्वरीमध्ये मेंटेनन्स डेपो उभारला जाणार आहे. जोगेश्वरी येथे वंदे भारत ट्रेन्ससाठी नवीन टर्मिनस बांधण्याची घोषणा आधीच करण्यात आली असून त्यावर काम सुरू झाले आहे. दरम्यान, वंदे भारत ट्रेनसाठीचा मुंबई शहरातील वाडी बंदरनंतर जोगेश्वरी हा दुसरा डेपो असणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात २० लाख रुपयांचा निधी मंजुर केला होता. हा निधी पश्चिम रेल्वेला नुकताच प्राप्त झाला आहे. वंदे भारतसाठीचा डेपो मुंबईत जोगेश्वरी ते राम मंदिर रेल्वे स्थानकांदरम्यान उभारण्यात येणार आहे. या डेपोसाठी एकूण ६० कोटी रुपये खर्च येणार आहे. पश्चिम रेल्वेला २० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर या कामासाठी चालू महिन्यात निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली. पश्चिम रेल्वे या डेपोमध्ये एसी स्लीपर वंदे भारत सेमी-हायस्पीड ट्रेनची देखभालीचे काम करणार आहे.

रेल्वे खात्याने वंदे भारत ट्रेनसाठीच्या डेपो उभारणीसाठी मुंबई सेंट्रल आणि जोगेश्वरी अशी दोन ठिकाणाची पाहणी केली होती. मुंबई सेंट्रलऐवजी जोगेश्वरी येथे मोठी जागा उपलब्ध होत असल्याने तेथे हा डेपो बांधला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या डेपोमध्ये वंदे भारत ट्रेन धुण्यासाठी १० रेल्वे गाड्यांसाठी स्वतंत्र वॉशिंग लाईन असेल. शिवाय जोगेश्वरी येथे ६९ कोटी रुपये खर्च करून नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यात येणार आहे. या डेपोत २४ गाड्या ठेवण्याची क्षमता असणार आहे.

जोगेश्वरी येथे ६०० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद आकाराचा प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार असून त्याच्या दोन्ही बाजूला रेल्वे ट्रॅक असणार आहेत. या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना रेल्वेगाडीतून चढता आणि उतरता येणार आहे. या रेल्वे टर्मिनसमुळे गुजरातकडे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची सोय होणार आहे. शिवाय मुंबईतील बोरिवली, कांदिवली, अंधेरी, वसई आणि उत्तर-पश्चिम उपनगरातील भागांत राहणाऱ्या किंवा तेथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी मुंबई सेंट्रल, दादर आणि वांद्रे टर्मिनसपर्यंत जाण्याची गरज राहणार नाही.

दरम्यान, वाडी बंदर येथे मध्य रेल्वेने एसी स्लीपर वंदे भारत ट्रेन्सच्या देखभालीसाठी सुविधा केंद्र उभारण्याचे काम सुरू केले आहे. वाडी बंदर कोचिंग डेपो १८८२ साली बांधण्यात आला होता. आता वंदे भारत ट्रेन्सची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी त्याचा पुनर्विकास केला जात आहे. शेड व रेल्वे मार्ग बांधण्याबरोबरच ५४ कोटी रुपये खर्चून आठ खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यात आधीच लिनन वॉशिंग प्लांट आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मोठे यार्ड याचा समावेश आहे.

२०२१-२२ मध्ये २०० वंदे भारत ट्रेनच्या उत्पादन सह देखभालीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. वंदे भारत ट्रेनची देखभाल, पायाभूत सुविधांचा विकास आणि अद्ययावतीकरण करण्यासाठी रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेला ठिकाणांची सविस्तर तपासणी करण्यास सांगितले आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या