मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही धन दांडग्यांसाठी; दौंड-पुणे प्रवासी संघटना आक्रमक, दौंडला थांबा देण्याची मागणी

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही धन दांडग्यांसाठी; दौंड-पुणे प्रवासी संघटना आक्रमक, दौंडला थांबा देण्याची मागणी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 11, 2023 07:03 AM IST

Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबई येथून मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. मात्र, या गाडीला दौंड या ठिकाणी थांबा नसल्याने दौंड-पुणे प्रवासी संघ आक्रमक झाला आहे.

Vande Bharat Express
Vande Bharat Express

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे मोठ्या थाटात उद्घाटन केलं. मात्र, आता या एक्सप्रेसच्या थांब्यावरून पुण्यातील काही प्रवासी संघटना नाराज झाल्या आहेत. ही गाडी केवळ धनदांडग्यांसाठी केल्याचा आरोप दौंड-पुणे प्रवासी संघाने केली असून या गाडीला दौंड येथे थांबा न देण्यात आल्याने ही संघटना आक्रमक झाली आहे. रेल्वेने दौंडसारख्या महत्वाच्या स्थानकावर या रेल्वेला थांबा द्यावा अशी मागणी या संघटनेचे अध्यक्ष विकास देशपांडे यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केल्यावर ही रेल्वे सायंकाळी ६.५० च्या सुमारास पुणे स्थानकावर आली. या रेल्वेचे पुणे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. पुणेकरांनी या रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या सोबत काही शाळांच्या मुलांनी देखील या एक्सप्रेसच्या सफरीचा आनंद लुटला. उत्साही वातावरणात पुणे सोलापूर वंदे भारत रेल्वेचे पुणे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, स्थानिक आमदारांनी स्वागत केल्यानंतर मोठ्याने हॉर्न वाजवत वंदे भारत सोलापूरच्या दिशेने रवाना झाली.

वंदे भारत गाडीच्या स्वागतासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर विशेष तयारी करण्यात आली होती. यावेळी पुण्याचे आमदार सुनील कांबळे, रेल्वेच्या पुणे विभागाच्या रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी.के. सिंह, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय सामग्री प्रबंधक विनोदकुमार मीना, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता विजयकुमार दंडस, विभागीय कार्मिक अधिकारी जितेंद्र प्रताप सिंह, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयसिंह मगर व अन्य उपस्थित होते.

वंदे भारत एक्सप्रेसला काही मोजक्याच ठिकाणी थांबा असल्याने दौंड पुणे प्रवासी संघाने नाराजी व्यक्त केली. विकास देशपांडे म्हणाले, की ही गाडी आलीशान जरी असली तरी या गाडीचे दर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नाहीत. या सोबतच पुणे सोलापूर रेल्वे मार्गावर दौंड हे महत्वाचे जंक्शन आहे. या ठिकाणी लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांना थांबा असतांना वंदे भारत एक्सप्रेसला मात्र, या ठिकाणी थांबा नाही. त्यामुळे सरकारने श्रीमंत व्यक्तींचा विचार न करता सर्व सामान्य नागरिकांना रेल्वेचे दर परवडावे आणि या गाडीला दौंड येथे थांबा मिळवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

वंदे भारत चे तिकीट दर

पुणे सोलापूर-इंटरसिटी तिकीट दर

- चेअरकार ४६० रू

- सेकंड सीटर क्लास - १२५ रू

पुणे - सोलापूर वंदेभारत तिकिट दर

- एक्झिक्यूटिव्ह क्लास - १६५० रू

चेअर कार - ९३० रू

पुणे-सोलापूर पोहोचण्याची इंटरसिटीला लागणारा वेळ

- ३.४५मी. ते ४ तास

पुणे-सोलापूरला पोहचण्यासाठी वंदेभारतला लागणारा वेळ

- ३ तास

IPL_Entry_Point

विभाग