वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत न्याय यात्रे’चे निमंत्रण स्वीकारले आहे. परंतु एका अटीवर राहुल गांधींच्या यात्रेत सामील होणार असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना खुले पत्र लिहिले आहे. वंचित बहुजन आघाडीला अद्याप ‘इंडिया आघाडी’त सामील करून न घेतल्याबद्दल आंबेडकर यांनी या पत्रात खंत व्यक्त केली आहे.
तथापि, मी या वस्तुस्थितीचा पुनरुच्चार करू इच्छितो की प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) ला अद्याप देशव्यापी इंडिया (INDIA) आघाडी अथवा राज्यस्तरावरील महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेतले नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचितला सामील करून न घेताच निमंत्रण पत्रात ‘इंडिया आघाडीचा महत्त्वाचा घटक’ म्हणणं म्हणजे विडंबन असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
‘भारत जोडो न्याय यात्रे’चं निमंत्रण स्वीकारत असलो तरी जोपर्यंत दरम्यानच्या काळात INDIA आघाडी व 'मविआ'मध्ये समाविष्ट होण्याचे निमंत्रित येत नाही तोपर्यंत या यात्रेत सहभागी होणे अवघड असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. 'इंडिया' आघाडीचं निमंत्रण नसताना ‘भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाल्यास युती झाल्याचे अंदाज बांधले जाऊ लागतील, जी अजून झालेलीच नाही, आणि या सर्वाचे नकारात्मक परिणाम होतील. तथापि आपण Vanchit Bahujan Aaghadi ला INDIA आघाडी तसेच मविआमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण द्यावे असा आमचा आग्रह असल्याचे आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे.
सध्याच्या धर्मांध, जातीय, विभाजनकारी वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात असणाऱ्या सर्वांनी सर्वसमावेशक भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रात अविरतपणे भाजप आणि आरएसएसशी लढत आहे. वंचित बहुजन आघाडी केवळ सहा वर्ष जुना पक्ष असला तरी आमचा वैचारिक लढा नवीन नाही. हा लढा म्हणजे मनुस्मृतीने संहिताबद्ध आणि टिकवून ठेवलेल्या हिंदू जाती व्यवस्थेविरुद्ध एक बंड आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळालेला वारसा आहे. विविध धार्मिक विचारांचा पुरस्कार या महापुरुषांनी केला होता. धर्म हा माणसाच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो, असं या महापुरुषाचे म्हणणे होते. आज आम्ही मुस्लिम, ओबीसी, गरीब मराठा आणि अर्थातच दलीत, आदिवासी व इतर भेदभावग्रस्त, उपेक्षित लोकांसाठी लढतो व त्यांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
संबंधित बातम्या