Tripathi Family Saved in Mumbai Boat Accident: मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे बुधवारी संध्याकाळी प्रवासी बोट समुद्रात बुडल्याने आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतून १०० हून अधिक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र, यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे अनेक कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना एका लहान मुलाच्या हट्टापायी अख्ख कुटुंब बचावले. नेमके असे काय घडले की, संबंधित कुटुंब बोटीत बसायला जात असताना त्यांना माघारी फिरावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील त्रिपाठी कुटुंब मुंबई फिरायला आले होते. गेट वे ऑफ इंडियाजवळ आल्यानंतर त्यांनी फोटो काढले आणि बोटीने पर्यटनस्थळ एलिफंटा येथे जाण्याचे ठरवले. बोटीत बसायला जात असताना मुलानं वडापाव खाण्यासाठी हट्ट धरला. मुलाच्या हट्टापायी त्रिपाठी कुटुंबाने त्याला वडापाव खाऊ घातला. मुलाचे वडापाव खाऊन झाल्यानंतर त्रिपाठी कुटुंब पुन्हा बोटीत बसण्यासाठी निघाले असता बोट समुद्रात बुडाल्याचे त्यांना समजले. मुलाने वडापावसाठी हट्ट धरला नसता तर त्रिपाठी कुटुंब देखील बोटीत चढले असते आणि त्यांनाही या दुर्घटनेला सामोरे जावा लागले असते. मात्र, मुलाच्या हट्टापायी त्रिपाठी कुटुंब सुखरूप बचावले.
इंजिनची चाचणी घेत असलेल्या नौदलाच्या स्पीड बोट नियंत्रण सुटले आणि मुंबई किनाऱ्याजवळ 'नीलकमल' या प्रवासी बोटला धडकली, जी १०० हून अधिक प्रवाशांना घेऊन गेट वे ऑफ इंडिया येथून प्राचीन लेण्यांचा संग्रह असलेल्या एलिफंटा बेटाकडे जात होती. स्पीड बोटच्या धडकेनंतर बोट पाण्यात बुडाली. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) जारी केलेल्या कागदपत्रांनुसार, बोटीवर ८४ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स घेऊन जाण्याची परवानगी होती. मात्र, नियमांचे उल्लंघन करून या बोटमध्ये १०० पेक्षा अधिक लोक चढवण्यात आली. याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात नेव्ही क्राफ्ट ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्च अँड रेस्क्यू मोहिमेअंतर्गत बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी नौदलाचे हेलिकॉप्टर आणि नौदल आणि तटरक्षक दलाच्या बोटी तैनात करण्यात आल्या. दोन्ही जहाजांवरील ११३ जणांपैकी १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जखमींसह ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. नौदलाच्या बोटीत सहा जण होते. त्यापैकी दोन जण बचावले असून तिघांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
संबंधित बातम्या