Viral News: देव तारी त्याला कोण मारी, अशी आपल्या मराठीत एक म्हण आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे घडली, जिथे अख्खी ट्रेन अंगावरून गेल्यानंतरही संबंधित व्यक्तीला खरचटले सुद्धा नाही, हे पाहून रेल्वेचे कर्मचारी देखील हैराण झाले आहेत, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रेल्वेतून प्रवास करताना किंवा रेल्वे रुळ ओलांडताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बिजनौर शहरातील कोतवाली येथील असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ट्रेनच्या लोको पायलटने बुधवारी रात्री एका व्यक्तीचा ट्रेनखाली आल्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली. यासंदर्भात माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण संबंधित व्यक्ती अजूनही रुळावर बसलेली दिसली आणि त्याला खरचटले नव्हते. तो दारूच्या नशेत असल्याचे समजत आहे. पोलिसांनी त्याला उठायला सांगितल्यावर तो धक्काबुक्की करू लागला. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपासणी केली असता संबंधित व्यक्तीचे नाव अमर बहादूर असे आहे आणि तो नेपाळचा रहिवासी आहे.
हा व्हिडिओ @SachinGuptaUP नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, 'यमराज सुट्टीवर असल्यावर असे होते! यूपीच्या बिजनौर जिल्ह्यात दारूच्या नशेत एक व्यक्ती रेल्वे रुळांवर झोपला. त्यानंतर ट्रेन त्याच्या अंगावरून गेली. याबाबत लोको पायलटने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना संबंधित व्यक्तीला जिवंत पाहून धक्का बसला.
व्हिडिओत दिसत आहे की, रेल्वे पोलीस कर्मचारी त्या व्यक्तीची विचारपूस करत आहेत आणि त्याला रेल्वे रुळावरून उठायला सांगत असल्याचे ऐकू येत आहेत. पोलिसांनी त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, 'खरोखर या व्यक्तीचे नशीब बलवत्तर आहे. अख्खी ट्रेन अंगावरून गेली तरी त्याला काही झाले नाही.' दुसऱ्याने म्हटले आहे की, 'लोको पायलटने रेल्वे पोलिसांची थट्टा केली', असे दिसत आहे. तिसऱ्याने आपल्या कंमेटमध्ये लिहिले आहे की, 'घटनेच्या वेळी तो नशेत होता', आता त्याला कोणी सांगितले की ट्रेन त्याच्या अंगावरून गेली, तर त्याला खरे वाटणार नाही.' आणखी एका व्यक्तीने लिहिले आहे की, 'जर तुमच्या नशिबात मृत्यू नसेल तर, तुम्हाला काहीही होणार नाही.'