Ramdas Athawale Viral Video: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अखेर या निवडणुकीचा निकाल बुधवारी (०६ नोव्हेंबर २०२४) जाहीर झाला. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्यमान उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा पराभव केला. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या चाव्या पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात गेल्या आहेत.या विजयाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना जगभरातून शुभेच्छा आणि अभिनंदनाचे मेसेज येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामरास आठवले यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
रामदास आठवले म्हणाले की, ‘डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीचे आहेत. माझ्या पक्षाचेही नाव रिपब्लिकन आहे. डोनाल्ड ट्रम्प हे डॅशींग नेते आहेत. आता ते त्या ठिकाणी निवडणून आले आहेत. अमेरिकेतील हिंदू असो किंवा मुस्लीम सर्वांनी त्यांना मतदान केले आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची मते त्यांना मिळाली आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले, याचा आनंद आहे. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या असून डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार होत्या. त्या निवडून आल्या असत्या तर अधिक चांगले झाले असते. परंतु, ट्रम्प जिंकल्याने भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी चांगले होतील. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोद आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चांगले संबंध आहेत.’
डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतूक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे मनापासून अभिनंदन. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळात चांगली कामगिरी केली. भारत-अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी मी उत्सुक आहे. आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया.'
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष असतील. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याने अध्यक्षीय निवडणुकीत आवश्यक २७० इलेक्टोरल मते मिळवली आहेत. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि उपाध्यक्ष कमला हॅरिसचा पराभव केला आहे. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत. ते अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांचा हा विजय ऐतिहासिक आहे. आपल्या पहिल्या विजयी भाषणात त्यांनी घुसखोरी थांबवण्याबाबत आणि कर सुधारण्याबाबत त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी या गोष्टींचा उल्लेख केला.