Puja Khedkar Latest News: केंद्रीय लोकसेवा आयोगाने वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांच्यावर कारवाई केली असून त्यांचे आयएएस पद तात्पुरते रद्द केले. याशिवाय, खेडकर यांना भविष्यातील कोणत्याही परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. खेडकर यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली असता त्या सीएसई २०२२ च्या नियमांतर्गत दोषी आढळल्या आहेत.
यापूर्वी १८ जुलै रोजी पूजा खेडकर यांची ओळख खोटी ठरवून परीक्षा नियमावलीत नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रयत्न केल्याप्रकरणी यूपीएससीकडून पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांना २५ जुलैपर्यंत एससीएनकडे उत्तर सादर करायचे होते. मात्र, उत्तरासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करता यावीत, यासाठी त्यांनी ४ ऑगस्टपर्यंतची मुदत मागितली होती.
यूपीएससीने म्हटले आहे की, त्यांनी उपलब्ध रेकॉर्डची काळजीपूर्वक तपासणी केली आणि सीएसई २०२२ नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल त्या दोषी आढळल्या. सीएसई-२०२२ साठी त्यांची तात्पुरती उमेदवारी रद्द करण्यात आली आहे आणि तिला यूपीएससीच्या भविष्यात कोणतीही परीक्षा देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर यूपीएससीने २००९ ते २०२३ या कालावधीत सीएसईच्या अंतिम शिफारस केलेल्या १५,००० हून अधिक उमेदवारांच्या उपलब्ध आकडेवारीची सखोल तपासणी केली आहे.पूजा खेडकर यांचे प्रकरण वगळता अन्य कोणत्याही उमेदवाराने सीएसई नियमांनुसार परवानगीपेक्षा जास्त प्रयत्न केल्याचे आढळून आलेले नाही, असे यूपीएससीचे म्हणणे आहे. पूजा खेडकर यांच्या बाबतीत यूपीएससीच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये त्यांच्या प्रयत्नांची संख्या शोधता आली नाही कारण त्यांनी स्वत:च्या नावासह तिच्या आई-वडिलांच्याही नावातही बदल केला. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी एसओपी अधिक मजबूत करण्याच्या प्रक्रियेत असल्याचे यूपीएससीचे म्हणणे आहे.
दरम्यान, नागरी सेवा परीक्षेत अनुमत मर्यादेपेक्षा जास्त प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पूजा खेडकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल राखून ठेवला. खेडकर यांनी अटकपूर्व जामिनाद्वारे आपण निर्दोष असल्याचा दावा केला आणि एफआयआरमध्ये आपल्यावर चुकीचे आरोप करण्यात आल्याचे नमूद केले होते.