जळगावमध्ये प्रचारादरम्यान अचानक अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, हेलिकॉप्टरनं मुंबईला रवाना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जळगावमध्ये प्रचारादरम्यान अचानक अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, हेलिकॉप्टरनं मुंबईला रवाना

जळगावमध्ये प्रचारादरम्यान अचानक अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, हेलिकॉप्टरनं मुंबईला रवाना

Nov 16, 2024 10:00 PM IST

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार करताना अस्वस्थ वाटू लागल्याने गोविंदाला अर्धवट प्रचार सोडावा लागला.

जळगावमध्ये प्रचारादरम्यान अचानक अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली
जळगावमध्ये प्रचारादरम्यान अचानक अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली

Govinda Health Updates: बॉलिवूड अभिनेता आणि महायुतीचा स्टार प्रचारक गोविंदाची जळगावमध्ये प्रचारादरम्यान तब्येत बिघडल्याने तो ताबडतोब हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाला. गोविंदाने काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो महायुतीचा प्रचार करत आहे. मात्र, आज जळगावात प्रचारदरम्यान छातीत दुखू लागल्याने त्याला प्रचार अर्धवट सोडावा लागला.

गोविंदा शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होता. त्याने मुक्ताईनगर, बोडवड, चोपडा आणि पाचोरा या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. मात्र, पाचोरा येथे महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांचा प्रचार करताना अचानक गोविंदाचा गोळी लागलेला पाय दुखू लागला आणि त्याला अस्वस्थ जाणवू लागले. यानंतर गोविंदाने प्रचार थांबवला. मुंबईला रवाना होण्यापूर्वी त्याने नागरिकांना नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहण्याचे आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

मुंबईला रवाना होण्यापूर्वी गोविंदा काय म्हणाला?

किशोर पाटील यांचा प्रचार करताना गोविंदा म्हणाला की, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील किशोर पाटील यांच्यासोबत आहेत, जे देशाच्या प्रगतीसोबत आहेत. किशोर पाटील विजयी व्हावे, अशी प्रार्थना करतो. जनतेने मला भरभरून प्रेम दिले. परंतु, माझ्या छातीत दुखत आहे.मला कोणताही धोका पत्करायचा नसल्यामुळे मी आता हा दौरा अर्धवट सोडून मुंबईला परत जात आहे. मी इथल्या लोकांची माफी मागतो. '

महायुतीचा विजय होणार- गोविंदा

'महाराष्ट्रात महायुती नक्की जिंकेल. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक सेलिब्रेटी पुढे आले आहेत. मला महाराष्ट्राच्या भूमीचे वरदान लाभले. नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे संपूर्ण जग महाराष्ट्राकडे पाहू लागले. नक्कीच राज्याची प्रगती होत आहे. मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत आहे', असेही गोविंदा म्हणाला.

महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत असणार आहे. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. तर, २०१४ मध्ये भाजपला १२२, शिवसेनेला ६३ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. परंतु, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

 

 

 

 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर