अन्नाच्या शोधात निघालेल्या पक्ष्यांच्या थव्याने विमानांचा मार्ग रोखल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लगाला. पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या परिसरात सकाळी मोठ्या प्रमाणात पक्षी आढळून आले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने (ATC) सुमारे एक तासासाठी धावपट्टी बंद ठेवली. याचा फटका अनेक विमान सेवांना बसला. पुणे विमानतळावरील 'हेवी बर्ड अॅक्टिव्हिटी'मुळे विमानतळावरील दोन ते तीन विमानसेवेवर परिणाम झाला.
मुंबईहून पुण्याला जाणारे एअर इंडियाचे विमान तब्बल तासभर पुणे विमानतळावर घिरट्या घालत होते. त्याचप्रमाणे पुण्याहून दिल्लीला जाणारे दुसरे विमान पुणे विमानतळावरील धावपट्टीवरून उड्डाणच करू न शकल्याने प्रवासी विमानतळावरच अडकून पडले होते.
एअर इंडियाचे मुंबईहून पुण्याला जाणारे विमान (एआय ८४१) सकाळी १० वाजता मुंबई विमानतळावरून निघाले आणि १०.३० वाजता पुण्याला पोहोचणार होते. मात्र विमान धावपट्टीवर उतरलेच नाही. या विमानातून प्रवास करणाऱ्या रोहित मोटवानी यांनी सांगितले की, विमानाने मुंबईहून नियोजित वेळेत उड्डाण केले आणि आम्ही पुणे विमानतळावर सकाळी १०.३० वाजता उतरणार होतो. मात्र पुणे विमानतळाभोवती विमान फिरत राहिले. एक तास विमान हवेत घिरट्या घालत होते. मात्र लँडिंगची परवानगी न सकाळी पावणेअकराच्या सुमारास पायलटने सांगितले की, पुणे विमानतळावर पक्ष्यांच्या मोठ्या हालचालींमुळे आम्ही उतरू शकणार नाही आणि म्हणून विमान मुंबईला परत नेत असल्याचे जाहीर केले.
त्यानंतर आम्ही मुंबई विमानतळावर परतलो आणि उतरल्यानंतर विमान कंपनीने तेच विमान पुण्याकडे रवाना होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आम्ही त्याच विमानाने पुण्याला गेलो. साडे दहा वाजते येणारे विमान दुपारी साडेतीन वाजता पुणे विमानतळावर पोहोचले. पहिल्या प्रस्थानावेळी विमान ८० टक्के भरले होते, पण दुसऱ्या प्रस्थानावेळी काही प्रवाशांनी पूर्ण परताव्याची मागणी केली आणि विमानप्रवास करण्यास नकार दिला, असे मोटवानी यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे पुणे विमानतळावरून सकाळी सव्वा अकरा वाजता पुण्याहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान (६ ई २६६१) पक्ष्यांच्या हालचालींमुळे विलंबाने टेक ऑफ केले. पुणे विमानतळावरून दुपारी १२.३० वाजता रवाना झाले. चेन्नईहून येणारे एक विमान हैदराबादकडे वळविण्यात आल्याने पुणे विमानतळावर येणारी इतर काही उड्डाणेही वळविण्यात आली.
पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले, 'पुणे विमानतळावर आज सकाळी पक्ष्यांची असामान्य वर्दळ होती आणि त्यामुळे काही विमानसेवेवर परिणाम झाला होता. मुंबईहून पुण्याला जाणारे एक विमान परत पाठविण्यात आले तर काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले. पण काही तासांतच परिस्थिती पुन्हा सामान्य झाली आणि त्यानंतर दिवसभर विमानसेवा सुरळीत होती.