Elderly couple suicide: अनेक हालअपेष्टा सहन सहन करून पालक आपल्या मुलांचं संगोपन करतात. त्यांचं शिक्षण करतात. एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या पायावर उभ करतात. मात्र, जेव्हा या आई वडिलांना सांभाळायची वेळ येते तेव्हा ही मुले मात्र, पाठ फिरवतात. एवढेच नाही तर ही मुलं मोठी झाल्यावर पालकांना अमानुषपणे वागणूक देत मालमत्तेसाठी छळ करतात. अशीच एक घटना राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात घडली असून त्रस्त झालेल्या ७० वर्षांच्या वृद्ध आई वडिलांनी घरातील पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवलं. तसेच भिंतीवर एक चिठ्ठी चिकटवून त्यात त्यांची मालमत्ता हडप करू इच्छिणाऱ्या व छळ करणाऱ्या मुलांचा उल्लेख त्यांनी केला आहे.
हजारीराम बिश्नोई (वय ७०) आणि त्यांची पत्नी चावली देवी (वय ६८) असे आत्महत्या केलेल्या वृद्ध पती पत्नीच नाव आहे. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात हे दोघे त्यांच्या मुलांसोबत राहत होते. करणी कॉलनीमधील त्यांच्या घरातील पाण्याच्या टाकीत दोघांचाही मृतदेह गुरुवारी (१० सप्टेंबर) आढळून आले. या वृद्ध दाम्पत्याला दोन मुलं आणि दोन मुली असे चार अपत्य असून आत्महत्या करण्यापूर्वी दाम्पत्यानं लिहिलेल्या चिठ्ठीत मुलगा राजेंद्र व सुनीलवर गंभीर आरोप केले आहेत. दोघांनीही संपत्तीच्या वादातून त्यांना अनेकवेळा मारहाण केली व त्यांना उपाशी ठेऊन जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचं त्यात म्हटलं आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्याला दोन मुले आणि दोन मुली अशी चार मुले होती. घराच्या भिंतीवर चिकटवलेल्या दोन पानांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिलं की, त्यांचा एक मुलगा राजेंद्र याने त्यांना तीन वेळा, तर दुसरा मुलगा सुनील याने देखील त्यांना दोन वेळा मारहाण केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिलं की, हा प्रकार कुणाला संगीतल्यास तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास झोपतेच हत्या करण्याची धमकी देखील मुला-मुलींनी दिली. चिठ्ठीत राजेंद्र आणि त्याची पत्नी रोशनी, सुनील, त्याची पत्नी अनिता आणि मुलगा प्रणव तसेच या दाम्पत्याच्या मुली मंजू आणि सुनीता व आणखी काही नातेवाईकांनी त्यांचा छळ केल्याचा उल्लेख आहे.
या दाम्पत्यानं लिहिलं की, त्यांच्या सर्व मुलांना त्यांच्या नावावर असलेली मालमत्ता हवी आहे. या दाम्पत्याला फसवून, त्यांच्याशी भांडण करून त्यांच्या मुलांनी तीन भूखंड आणि एका कार स्वत:च्या नावावर करून घेतली होती. राजेंद्र, मंजू आणि सुनीता यांच्या नावे केलेली कार विकण्यास आणि सुनील व त्याची पत्नी अनिता यांनी करणी कॉलनीतील घर जबरदस्तीने त्यांच्याकडून जबरदस्तीने हिसकावल्याचे लिहिले आहे.
मुलांनी त्यांची संपत्ती घेऊन देखील त्यांचा छळ सुरूच होता. त्यांना त्यांची मुलं जेवण देखील देत नव्हते. त्यांना दररोज फोनवर शिवीगाळ करून मारहाण देखील केली जात असल्याचं या दाम्पत्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. चिठ्ठीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा सुनीलने त्यांना फोन करून कटोरा घेऊन भीक मागा. नागौरचे पोलिस अधीक्षक नारायण तोगास यांनी सांगितले की, हजारीराम आणि चाळी यांच्या घरात दोघे दिसत नसल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता गुरुवारी घरच्या पाण्याच्या टाकीत त्यांचे मृतदेह आढळले.