Maharashtra Weather update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात चढ उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे पिकांना फटका बसला होता. काही ठिकाणी गारपीट देखील झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. सध्या तरी राज्यावर पाऊस नसला तरी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आद्रता येत आहे. या मुळे काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. तर काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाळ्याची चाहूल लागणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातून पाऊस आणि थंडी दोन्ही हद्दपार होऊ लागले आहेत. पावसाच्या विश्रांतीनंतर आता थंडीही हळू हळू गायब होत आहे. या सोबतच उकाडा वाढत आहे. राज्यात रविवारी (दि१०) उन्हाचा चटका कायम राहणार असून कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात कमाल तापमान ३८ तर इतर शहरांत ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मुंबईमध्ये कमाल तापमान ३६ तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर पुण्यामध्ये कमाल तापमान ३७ तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज एक द्रोणीका रेषा म्हणजेच कमी दाबाची रेषा विदर्भ आणि साऊथ तमिळनाडू पर्यंत जात आहे. तसेच एक पश्चिमी विक्षोभ म्हणजेच वेस्टर्न डिस्टन्स १२ मार्चला पश्चिम हिमालय व लगतच्या उत्तर भारताला प्रभावित करणार आहेत. बंगालच्या उप महासागरातून येणारे प्रती चक्रवातीय वाऱ्यांच्या बरोबर आग्नेय व दक्षिण वाऱ्यांबरोबर मराठवाडा व विदर्भात थोडी आद्रता येत आहे. याचा परिमाण राज्याच्या हवामानावर होणार आहे.
येत्या ४८ तासात राज्याचा संपूर्ण भागात आकाश निरभ्र राहणार आहे. त्यानंतर हवामान पाच ते सात दिवस कोरडे राहील. राज्यात किमान तापमान १२ तारखेपर्यंत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे व त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात एक ते दोन डिग्री सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे व आजूबाजूच्या परिसरात वातावरण कोरडे राहील व आकाश निरभ्र राहील. व कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही.
मराठवाडा आणि पूर्व विदर्भात अंशतः ढगाळ हवामान होत आहे. मात्र, उन्हाचे प्रमाण देखील वाढले आहे. दुपारी तापमानात मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. सूर्य दुपारी आग ओकत असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. मात्र, उत्तरेकडील राज्यांमध्ये ११ ते १५ मार्चदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वायव्य सीमेवरून प्रवेश करणारे पश्चिमी वाऱ्यांचे झोत प्रामुख्याने उत्तर अरबी समुद्रावरुन येत आहेत. यामुळे पुढील तीन-चार दिवस उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाची आणि गारपिटीची दाट शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. राज्यात सध्या या पश्चिमी वाऱ्याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे पुढील काही दिवस वातावरण कोरडे राहणार आहे.
संबंधित बातम्या