unseasonal rain in Stat : राज्यात सोमवारी (दि १३) तारखेला ११ मतदार संघातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या साठी शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. मात्र, अनेक प्रचार सभेत पावसाने विघ्न टाकले. असे असतांनाही अनेक नेत्यांनी भर पावसात सभा घेत वातावरण चांगलेच तापवले. राज्यात सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर आदि जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी वाऱ्याच्या जोरामुळे झाडे उन्ममळून पडली. तर विद्युत खांबाचे देखील मोठे नुकसान झाले.
राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने चौथ्या टप्प्यातील प्रचारात विघ आले. असे असतांना या सभा पार पडल्या. पुण्यातील शिरूर येथे अजित पवार यांनी भर पावसात सभा घेत विरोधकांवर निशाणा साधला. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन गेल्या वेळेला चूक केली. आता ही चूक सुधारायची आहे असे अजित पवार म्हणाले. राज्यात काल पुणे, बारामती, सातारा, सांगली, बेळगाव, मिरज, बीड, सोलापूर जिल्ह्यात तूफान पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह, मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
मिरज येथे सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे मिरज शहरातील रस्त्यावरील झाडे मुळासकट उखडून पडली. झाडांच्या फांद्या पडून अनेक ठिकाणी गाड्यांचे नुकसान झाले. तर अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.
पावसाचा जोर ऐवढा होता की अनेक घरात पाणी साठले. तर पाण्यामुळे रस्ते बंद झाले होते. यामुळे नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागले. सांगलीतील वाळवा तालुक्यातील कुरळप परिसराला गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले. या परिसरातील ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले.
पुणे जिल्ह्यात आणि शहरात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी विद्युत खांब तुटले. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ही संथ गतीने पुढे जात होती. बारामती, शिरूर येथे देखील जोरदार पाऊस झाला. अनेक घरांची पत्रे उडाली तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले.
राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील काही दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड जिल्ह्यांमध्ये ऑरेंन्ज अलर्ट देण्यात आला आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना देखील ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे.