Unseasonal Rain in Vidarbha : विदर्भाला अवकाळी पावसाने शनिवारी चांगलेच झोडपले. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याचा पिकांना फटका बसणार आहे. विदर्भासह मराठवाड्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांना बसत आहेत.
शनिवारी विदर्भातील, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर परिसरात हा पाऊस झाला. संध्याकाळी हा जोरदार पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात संध्याकाळी पाचच्या सुमारास अचानक ढग दाटुन आले. आणि काही वेळातच वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील देवगाव, तळेगाव, दशासर परिसरामध्ये गारपीट झाली. या मुळे रब्बी पिकांचे मोठ्या नुकसान झाले. धामणगाव तालुक्याला दुपारी जोरदार गारपीट झाल्याने फळबागेचे नुकसान झाले.
तर वर्धा जिल्ह्यात देखील मोठा अवकाळी पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. वर्धाच्या देवळी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. येथील काही भागात मोठी गारपीट झाली. गारांच्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने पिके भुईसपाट झाली. देवळी तालुक्यातील भिडी, तळणी, आकोली, लोणी, आगरगाव या भागात सर्वाधिक पाऊस झाला. तर पाण्यामुळे चणा, गहू, तूरीचे नुकसान झाले आहे. वर्ध्यात आज देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील विरखेडे, वाटखेड, गोंधळी, घारपळ या गावांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तूर, हरभरा, गहू, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.
राज्यात आज देखील पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांसह पावसाची शक्यता आहे.